वरळीच्या मैदानात Aditya विरुद्ध Raj Thackeray, मनसेचं 'लाव रे तो व्हिडिओ

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा काका विरुद्ध पुतण्या, वरळी मतदारसंघातील कामांची MNS करणार पोलखोल  

Updated: Nov 25, 2022, 10:45 PM IST
वरळीच्या मैदानात Aditya विरुद्ध Raj Thackeray, मनसेचं 'लाव रे तो व्हिडिओ title=

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या लाव रे तो व्हिडिओनं खळबळ उडवून दिली होती. आता तेच शस्त्र घेऊन राज ठाकरे पुतण्याविरोधात (Raj Thackeray vs Aditya Thackeray) मैदानात उतरणार आहेत. वरळी मतदारसंघातल्या (Worli Constituency) कामांची पोलखोल करण्यासाठी मनसेनं षड्डू ठोकले आहेत. त्याच 'लाव रे तो व्हिडिओ'चं ट्रेलर मनसेनं दाखवलंय.

आदित्य ठाकरे यांचं वरळीकरांना पत्र
काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेंनी वरळीकरांना पत्र लिहून वरळीचा विकास केल्याचा दावा केला होता. ठाकरे गटाचे (Thackeray Group) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आपला मतदारसंघ असलेल्या वरळीतल्या (Worli) नागरिकांना उद्देशून एक पत्र (Letter) लिहिलं होतं. गेल्या 3 वर्षात वरळीत दुसऱ्यांना हेवा वाटावा अशी प्रगती झाली. त्यामुळे आता इतर पक्षांनाही वरळीत वेळ आणि पैसा खर्च करावासा वाटतो असं म्हणत त्यांनी टोला लगावला होता.

नवीन बस थांबे असोत, चांगले फुटपाथ, मजबूत रस्ते असोत, हिरवीगार मोकळ्या जागा असो, किंवा सामुदायिक स्तरावर व वैयक्तिक स्तरावर लसीकरण ड्राइव्ह आणि इतर समस्येचे निराकरण असो आपण वरळीकरांच्या सहकार्याने करत आलो आहोत असं आदित्य ठाकरे यांनी आपल्या पत्रात लिहिलं होतं. यापूर्वी जूनमध्ये गलिच्छ राजकारण आणि गद्दारी करून लोक हिताचा विचार करणारे सरकार पाडलं गेल. पण ते आम्हाला निःस्वार्थपणे काम करण्यापासून आणि आपली सेवा करण्यापासून रोखू शकणार नाहीत. आम्ही तुमचा आशीर्वाद आणि प्रेमासाठी काम करतच राहू आणि हेच आम्हाला पुढे ऊर्जा देत राहील, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं.

मनसे देणार पत्राला उत्तर
काका राज ठाकरे आणि वरळीकरांच्या आशिर्वादने वरळीत युवराज आमदार म्हणून निवडून आले. आता नेहमीप्रमाणे शिवसेनेकडे असलेलं भावनिक ब्रम्हास्त्र आदित्य ठाकरे यांनी पुन्हा बाहेर काढलं आहे, असा टोला मनसेने लगावला आहे. आदित्य ठाकरे यांनी वरळीत सुधारणा केल्याच्या दाव्यावर मनसने पलटवार केला आहे. आदर्श नगर कोळीवाड्यातील रस्ते आणि फूटपाथची दुरवस्था लाव रे व्हिडिओच्या माध्यमातून दाखवले जाणार आहेत. आदित्य ठाकरे खोटं बोलतायत आणि रेटून बोलत असल्याचा आरोपही मनसेने केला आहे. 

हे ही वाचा : गौतमी पाटीलच्या लावणीला आवर घाला, नाहीतर... मनसेचा गंभीर इशारा

राज्याच्या राजकारणातला काका-पुतण्या संघर्ष
महाराष्ट्राच्या राजकारणात काका पुतण्या संघर्षाचा इतिहास नवा नाही.  गोपीनाथ मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे या काका-पुतण्यातला संघर्ष उभ्या महाराष्ट्रानं पाहिलाय. बीडमध्ये शिंदे गटाचे नेते जयदत्त क्षीरसागर आणि राष्ट्रवादीत असलेले त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांच्यातला वाद एवढा विकोपाला गेला की, जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन शिवसेनेत गेले. तर रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे आणि भाजपवासी झालेले त्यांचे पुतणे अवधूत तटकरे यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे.  

असाच संघर्ष आता आदित्य आणि राज ठाकरेंमध्ये रंगतोय. आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या (Mumbai Municipal Corporation Election) तोंडावर काका-पुतण्याच्या या संघर्षाला आणखी धार येणार आहे.