उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं! शिवसेना आमदार आग्रही

राज्यातला सत्तास्थापनेचा पेच १५ दिवसानंतरही कायम आहे. 

Updated: Nov 8, 2019, 04:40 PM IST
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं! शिवसेना आमदार आग्रही  title=

मुंबई : राज्यातला सत्तास्थापनेचा पेच १५ दिवसानंतरही कायम आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं, यासाठी शिवसेनेचे सगळे आमदार आग्रही आहेत. मुख्यमंत्रीपदाबाबत शिवसेनेची भूमिका अजूनही ठाम आहे. ठरल्याप्रमाणे भाजपने अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद द्यावं, असं शिवसेनेने निकाल लागल्याच्या दिवसापासून सांगितलं आहे, पण भाजप मात्र शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यायला तयार नाही, त्यामुळे राज्यात अजूनही सरकार स्थापन झालेलं नाही.

एकीकडे भाजप आणि शिवसेनेमध्ये संघर्ष सुरु असतानाच संजय राऊत यांनी आमच्याकडे १७० आमदारांचा पाठिंबा असल्याचं वक्तव्य वारंवार केलं आहे. तसंच राऊत यांनी मागच्या १५ दिवसांमध्ये शरद पवार यांची तीनवेळा भेट घेतली आहे. आजही संजय राऊत हे शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी गेले होते. 

दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपावला आहे. विधानसभा ही आज रात्री १२ वाजता बरखास्त होईल, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनावर जाऊन त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला. राज्यपालांनीही हा राजीनामा स्वीकारला आहे.