श्रीकांत शिंदे तुमचा मुलगा नाही का? 'खरी शिवसेना' शिंदेंची निकालानंतर राऊतांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Shivsena Mla Disqualification : विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर एकाधिकारशाही आणि घराणेशाही मोडीत निघाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. त्यावर बोलताना खासदार संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आकाश नेटके | Updated: Jan 11, 2024, 11:02 AM IST
श्रीकांत शिंदे तुमचा मुलगा नाही का? 'खरी शिवसेना' शिंदेंची निकालानंतर राऊतांचा मुख्यमंत्र्यांना सवाल title=

Shivsena Mla Disqualification : शिवसेना अपात्रता प्रकरणाचा निकाल बुधवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालाली पक्षच खरी शिवसेना असल्याचा निका राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. त्याचवेळी वेगवेगळ्या कारणांचा आधार घेत दोन्ही गटांच्या आमदाराविरुद्धच्या अपात्रता याचिका अध्यक्षांना फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेच सगळेच आमदार पात्र ठरले आहेत. या निकालानंतर घराणेशाहीवरुन खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.

"भाजपचे सध्याचे पुढारी आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नक्की काय निकाल दिली, जो महाराष्ट्राला अपेक्षित होता तोच दिला. लोकांना काही आश्चर्य, धक्का वाटलेलं नाही. पण लोकांच्या मनात चीड निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांवर न्याय देण्याची जबाबदारी दिली होती. राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाचे वकील म्हणून काम केलं. शिंदे यांच्या फुटलेल्या गटासाठी वकिली करावी अशा पद्धतीने त्यांचे वाचन सुरु होतं. ते न्यायमूर्तींचे निकालपत्र होतं. चोरांची, लफग्यांची, पाकिटमारांची वकिली करावी अशा पद्धतीने ते निकालपत्राचे वाचन करत होते. त्यांनी जे आक्षेप नोंदवेले आणि निकाल दिला ते सगळं खोटं आहे. प्रत्येक पुरावा सुप्रीम कोर्टात आणि त्यांच्यासमोर ठेवला आहे. पण सर्वोच्च न्यायालयाला खोटं ठरवण्याचा निकाल महाराष्ट्रामध्ये भाजपने केला. राहुल नार्वेकर भाजपच्या कार्यकर्त्याप्रमाणे वागले. आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ आणि तिथे सत्य आणि न्यायाचा विजय होईल याची खात्री आहे. बेमान गटाचे लोक फटाके वाजवत आहेत. त्यांनी निर्णय खरा की खोटा आंतरआत्म्याला विचारावं," असे संजय राऊत म्हणाले.

"एकनाथ शिंदे घराणेशाहीचा अंत झाला म्हणतात मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाही का? श्रीकांत शिंदे मुलगा नाही हे सिद्ध करा. त्यांच्या मतदारसंघामध्ये श्रीकांत शिंदेसाठी माझा मुलगा द्या म्हणून मत मागितलं ना. त्यांच्या मुलाचे पक्षात काय योगदान होतं? मग त्यांनी सागांवे की श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाही. बाळासाहेब ठाकरेंची घराणेशाही कधीच नव्हती. शरद पवारांची घराणेशाही कधीच नव्हती. हा विचारांचा मार्ग पुढे घेऊन जाणारा एक मार्ग असतो. त्या विचाराने पुढे जाणारे त्या पिढीतील लोक पुढे जातात. लोकांना स्विकारायचे असेल तर स्विकारतात नाहीतर दूर करतात. एकनाथ शिंदे भाजपच्या हुकुमशाहीचे पुरस्कर्ते आहेत. एकनाथ शिंदे महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या टोळ्यांचे पुरस्कर्ते आहेत. बाळासाहेबांच्या शिवसेनेला गुजरातच्या लॉबीद्वारे इतिहासजमा करण्याची योजना आहे. शिवसेनेला इतिहासात जमा करणारे इतिहासात गाडले गेले," असा इशारा संजय राऊतांनी दिला.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

"लोकशाहीत बहुमताला महत्त्व असतं. बहुमत आमच्याकडे आहे. विधानसभेचंही आणि लोकसभेचंही. निवडणूक आयोगाने खरी शिवसेना आम्ही असल्याचं मान्य केलंय. एकाधिकारशाही आणि घराणेशाही मोडीत निघाल्याचं आजच्या निकालावरून दिसतंय. कोणीही आपल्याला वाटेल तसा निर्णय घेऊ शकत नाही. लोकशाहीत एखाद्या पक्षाचा प्रमुख मनमानी करत असेल तर पक्षातील इतर सहकाऱ्यांना त्याच्याविरोधात आवाज उठवण्याचा अधिकार आहे. अशावेळी दहाव्या परिशिष्टातील तरतुदी लागू होत नाहीत. त्यामुळे पक्षप्रमुख किंवा पक्षाध्यक्ष यांचं एकट्याचं मत संपूर्ण पक्षाचं मत असू शकत नाही. कोणताही राजकीय पक्ष एकट्या माणसाची खासगी मालमत्ता होऊ शकत नाही असा निर्णय अध्यक्षांनी दिला आहे," असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निकालानंतर म्हटलं होतं.