'विधानसभेत झालं ते...', राज ठाकरेंचा मनसे पदाधिकाऱ्यांना आदेश! एक टीम बनवून....

BMC Election MNS Raj Thackeray Order: राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वीच आज होणाऱ्या बैठकीसंदर्भातील निर्देश पदाधिकाऱ्यांना दिले होते.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 7, 2025, 01:52 PM IST
'विधानसभेत झालं ते...', राज ठाकरेंचा मनसे पदाधिकाऱ्यांना आदेश! एक टीम बनवून.... title=
राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश (फाइल फोटो)

BMC Election MNS Raj Thackeray Order: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकींसाठी तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. आज राज ठाकरेंनी त्यांच्या निवासस्थानी म्हणजेच दादरमधील शिवाजी पार्कजवळील 'शिवतीर्थ' येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. या बैठकीमध्ये राज यांनी पदाधिकाऱ्यांना नेमकं काय सांगितलं याबद्दलची माहिती समोर आली आहे.

राज ठाकरेंनी काय आदेश दिले?

राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वीच 7 जानेवारी रोजी 'शिवतीर्थ'वर मुंबईतील 36 विभाग अध्यक्षांनी बैठकीसाठी उपस्थित रहावं असे आदेश दिले होते. त्यानुसार आज सकाळी दहा वाजल्यापासून मनसेच्या या आढावा बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीमध्ये मुंबई महापालिका निवडणुका तयारी विषयीचा आढावा राज यांनी घेतला. या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी विधानसभेत झालं ते विसरा असा सल्ला दिला आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागा असा आदेश राज ठाकरेंनी आज मनसेच्या विभाग अध्यक्षांच्या बैठकीत दिला.

तयार करणार एक स्पेशल टीम; ही टीम काय काम करणार?

तसेच या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी मनसेच्या नेत्यांची एक टीम राजकीय स्थितीचा आढावा घेईल असं सांगण्यात आलं आहे. मनसेच्या या टीमकडून घेतला जाणारा राजकीय आढावा अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून त्यावरच पक्षाची मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतील पुढील वाटचाल निश्चित केली जाणार असल्याचं राज ठाकरेंकडून सांगण्यात आल्याचं समजतं. आगामी निवडणूकीत मनसेची राजकीय वाटचाल कशी असेल, त्याचप्रमाणे इतर पक्षांसोबत युतीबाबतच्या चर्चेबाबतचे अंतीम निर्णय घेताना राजकीय आढावा घेणा-या टिमची मतं लक्षात घेतली जातील, असं पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आलं आहे. मनसेच्या विभाग अध्यक्षांना संघटना बळकट करण्याचे आदेश राज ठाकरेंकडून देण्यात आले आहेत. तसेच पक्षाची काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा असं मनसेच्या अध्यक्षांनी पदाधिकाऱ्यांना सांगितल्याचं वृत्त आहे. 

विधानसभेला सुपडा साफ

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 130 हून अधिक जागा लढवल्या होत्या. मात्र दादर आणि माहीम मतदारसंघामध्ये राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंसहीत सर्वच उमेदवार पराभूत झाले. 2019 च्या निवडणुकीत निवडून आलेले आणि नुकत्याच विसर्जित झालेल्या विधानसभेमध्ये मनसेचे एकमेव आमदार असलेले कल्याण ग्रामीणचे राजू पाटील देखील यंदा पराभूत झाले. या पराभवानंतर राज ठाकरेंनी सोशल मीडियावर पहिली प्रतिक्रिया नोंदवताना, "अविश्वसनीय" अशी एका शब्दाची पोस्ट केली होती. या निवडणुकीमधील राज यांच्या पक्षाचा सुपडा साफ झाल्याने मनसेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच असं झालं आहे की मनसेचा एकही आमदार सभागृहात नाही.