...अन् घरात शिरलेला चोर महिलेचा Kiss घेऊन पळून गेला; मालाडमधील विचित्र घटना

Mumbai Crime News: या प्रकरणामध्ये दुपारी तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर संध्याकाळपर्यंत आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. 

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 7, 2025, 02:38 PM IST
...अन् घरात शिरलेला चोर महिलेचा Kiss घेऊन पळून गेला; मालाडमधील विचित्र घटना title=
मालाडमधील विचित्र घटना (प्रातिनिधिक फोटो)

Malad Crime News: मुंबईमध्ये एका व्यक्तीला महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांना ताब्यात घेतलं. विशेष म्हणजे अगदीच विचित्र परिस्थितीमध्ये या व्यक्तीने गुन्हा केल्याचं तपासामध्ये समोर आलं आहे. आरोपी हा खरं तर एक भुरटा चोर आहे. चोरी आणि विनयभंगाच्या प्रकरणात या आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याला नोटीस देऊन सोडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हा सारा प्रकार मालाडमधील कुरार परिसरामध्ये 3 जानेवारी रोजी घडला आहे. 

नेमकं घडलं काय?

पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, ज्या महिलेचा विनयभंग या चोराने केला ती महिला 38 वर्षांची आहे. ही महिला घरी एकटीच असताना चोराने घरात प्रवेश केला. त्याने चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश करुन मुख्य दरवाजाची आतून कडी लावून घेतली. त्यानंतर चोराने या महिलेचं तोंड दाबलं आणि तिला तुझ्याकडे जे काही दागिने, रोख रक्कम, मोबाईल आणि एटीएम कार्ड असतील ती माझ्या ताब्यात दे, असं सांगितलं. मात्र या महिलेने घरात चोराने मागितलेल्या गोष्टींपैकी काहीच नसल्याचं सांगितलं. त्यानंतर या चोराने महिलेचं चुंबन घेतलं आणि तो दरवाजा उघडून घरातून पळून गेला.

महिलेने पोलिस स्टेशनमध्ये घेतली धाव

पीडित महिलेने कुरार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली आहे. योग्य कलमांअंतर्गत तक्रार नोंदवून घेण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत या चोराला अटक केली. हा चोर याच परिसरामध्ये वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता आरोपीच्या नावावर यापूर्वी कोणताही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. आरोपीचा कोणताही क्राइम रेकॉर्ड नसल्याने पोलिसांनी त्याला नोटीस देऊन सोडून दिलं. हा आरोपी त्याच्या कुटुंबासोबत राहत असून बेरोजगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

महिलांना धक्काबुक्की करणे, मनात लज्जा उत्पन्न होईल अशी वर्तवणूक करणे, महिलांच्या इच्छेशिवाय त्यांना स्पर्श करणे, अश्लील भाषा वापरणे, महिलांचं चुंबन घेणे यासारख्या कृत्यांसाठी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला जातो.