सुरक्षेच्या कारणास्तव अधिवेशन आटोपते घेण्याचा निर्णय - मुख्यमंत्री

सुरक्षेच्या कारणास्तव विरोधी पक्षाने देखील याला एकमताने पाठिंबा दिला आहे.

Updated: Feb 28, 2019, 01:18 PM IST
सुरक्षेच्या कारणास्तव अधिवेशन आटोपते घेण्याचा निर्णय - मुख्यमंत्री title=

मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणावाचं वातावरण असल्याने देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या विधिमंडळाचे अधिवेशन आटोपतं घेतलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला गेला आहे. सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांनी याची घोषणा केली. गुरुवारी सकाळी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत अधिवेशन आटोपते घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प विधीमंडळात मांडण्यात आला. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुंगनटीवार तर विधानपरिषदमध्ये अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी अंतरिम अर्थसंकल्प मांडला. त्यानंतर अधिवेशन आज संपवण्यात आलं आहे.

काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबई आणि राज्यातल्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. विधानभवनात झालेल्या या बैठकीला राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर आणि मुंबईचे पोलीस आयुक्त सुबोध जैस्वाल उपस्थित होते. अधिवेशनामुळे विधीमंडळ परिसरात मोठी सुरक्षा यंत्रणा लागते. विधानभवन आणि आझाद मैदानात हजारो पोलीस व्यस्त असतात. हा भार कमी करण्यासाठी अधिवेशन लवकर संपवण्याची विनंती मुंबई पोलीस आयुक्तांनी केली होती. त्याला सरकारनं सकारात्मक प्रतिसाद दिला आणि सर्वपक्षीय बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला. विरोधी पक्षाने देखील याला एकमताने पाठिंबा दिला आहे.