अखेर महाराष्ट्रात कर्फ्यू; उद्धव ठाकरेंची घोषणा

नाईलाजाने निर्णय घेतो..... आता गर्दी नाही म्हणजे नाहीच..... 

Updated: Mar 23, 2020, 05:57 PM IST
अखेर महाराष्ट्रात कर्फ्यू; उद्धव ठाकरेंची घोषणा title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई: सरकारी निर्देशांबाबत नागरिकांच्या अनास्थेमुळे अखेर राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव (COVID-19) रोखण्यासाठी महाराष्ट्रात अखेर संचारबंदी (Curfew) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी झालेल्या पत्रकारपरिषदेत ही घोषणा केली. यावेळी त्यांनी सांगितले की, ही काही मौजमजेची वेळ नाही. तरीही नागरिक रस्त्यावर काय सुरु आहे, हे बघण्यासाठी बाहेर पडतात. आज सकाळपासून रस्त्यांवर अनेक वाहने विनाकारण बाहेर पडल्याचे दिसून आले. त्यामुळे आम्हाला आता नाईलाजाने राज्यभरात संचारबंदी लागू करावी लागत आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

 

याशिवाय, राज्यातील एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण होऊ नये, यासाठीही राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्हे अजूनही कोरोनापासून सुरक्षित आहेत. या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच राज्यातंर्गत सुरु असलेली विमान वाहतूकही बंद करावी, असे पत्र उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना पाठवले आहे.दरम्यान, संचारबंदीच्या (Curfew) काळात जीवनावश्यक वस्तू, औषधांचे कारखाने आणि या सगळ्याची ने-आण करणाऱ्या व्यवस्था सुरु राहतील, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

* खासगी वाहने अत्यावश्यक कारणांसाठी सुरु राहतील. रिक्षात चालक सोडून एकजण आणि टॅक्सीत चालक वगळता दोन जणांना बसण्यास परवानगी
* जीवनावश्यक वस्तूंसह पशुखाद्याची दुकानेही सुरु राहतील. अनेकांच्या घरी पाळीव प्राणी असल्याने हा निर्णय. कृषीमालाची वाहतूकही सुरु राहणार.
* सर्व धर्मीयांचा प्रार्थनास्थळे पूर्णपणे बंद राहतील.
* कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर डॉक्टरांबरोबरच नर्स आणि अन्य मनुष्यबळ कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आशा, अंगणवाडी सेविका आणि होमगार्डच्या जवानांनाही वैद्यकीय प्रशिक्षण दिले जात आहे.
* आपण निर्णायक टप्प्यावर आहोत. कोरोनाचा प्रादुर्भाव आत्ताच रोखला नाही तर हा विषाणू जगात घातले तसे थैमान राज्यातही घालेल.
* घरी विलगीकरण केलेल्यांनी सूचना पाळाव्यात. जनतेच्या हितासाठीच कठोर पावले उचलत आहोत. 
* आशा, अंगणवाडी सेविका आणि होमगार्डच्या जवानांनाही वैद्यकीय प्रशिक्षण दिले जात आहे.
* जनता कर्फ्युला जनतेने दिलेल्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद. पण केवळ टाळ्या, वाजवणं म्हणजे व्हायरस पळवणे नव्हे. जीवाची बाजी लावून लढण्याऱ्यांसाठी ते होते.
* हा निर्णायक टप्पा आहे. पुढचे दिवस महत्वाचे आहेत, हे ओळखलं नाही तर वेळ मिळून आपण उपयोग केला नाही असं होईल.