अपयशाची जबाबदारी नेतृत्त्वानेच घ्यायला हवी; खडसेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

पक्षातील नाराजांची मोट बांधावी लागत नाही, ते आपोआप एकत्र येतात.

Updated: Dec 4, 2019, 06:43 PM IST
अपयशाची जबाबदारी नेतृत्त्वानेच घ्यायला हवी; खडसेंचा फडणवीसांवर हल्लाबोल title=

मुंबई: पक्षनेतृत्त्वाने अपयशाची जबाबदारी घेतली पाहिजे. यश माझ्यामुळे आणि अपयश दुसऱ्यामुळे हे धोरण साफ चुकीचे आहे, असे सांगत भाजप नेते एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षतेने देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे हे नेते भाजप नेतृत्त्वावर नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांची आज मुंबईत बैठक झाली. 

या बैठकीनंतर एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपले मन मोकळे केले. पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव पक्षातंर्गत विरोधकांमुळे झाला. या सगळ्यांची नावे मी वरिष्ठांपर्यंत पोहोचवली आहेत. आता या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे. मी ही गोष्ट स्वत: वरिष्ठांच्या कानावर घातली. मला कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही. गेल्या काही काळात जे काही घडले त्यामुळे पक्षातील अनेकजण अस्वस्थ आहेत. याबद्दल मी वरिष्ठांना कळवल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले.  

यावेळी पत्रकारांनी भाजपमध्ये ओबीसी नेतृत्त्वाला डावलले जात आहे का, असा प्रश्नही खडसे यांना विचारला. त्यावर खडसे यांनी म्हटले की, दुर्दैवाने हे चित्र खरे वाटत आहे. हे पटवून देताना खडसे यांनी प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे आणि संचेती या नेत्यांचा उल्लेख केला. 

तसेच अपयशाबद्दल माझा रोख हा माजी मुख्यमंत्र्यांवर नव्हे तर नेतृत्त्वावर आहे. तुम्ही यशाची जबाबदारी घेता तसे अपयशही स्वीकारले पाहिजे. पराभव झाल्यानंतर त्याची जबाबदारी पक्षावर ढकलणे योग्य नाही. वैयक्तिकरित्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली गेली पाहिजे, असे सांगत खडसे यांनी फडणवीसांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. तसेच पक्षातील नाराजांची मोट बांधावी लागत नाही, ते आपोआप एकत्र येतात, असे सूचक विधानही त्यांनी यावेळी केले.