मुंबई: जेष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांच्या निधनानंतर मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांवर ताशेरे ओढणारे दिग्दर्शक सचिन कुंडलकर आणि अभिनेता जितेंद्र जोशी यांच्यात शनिवारी फेसबुकवर शाब्दिक चकमक झाली. विजय चव्हाण यांच्या निधनानंतर साचेबद्ध प्रतिक्रिया देऊन शोक व्यक्त करणाऱ्या कलाकारांना सचिन कुंडलकर यांनी फटकारले होते. विजय चव्हाण आजारी असताना त्यांना किती जण भेटायला गेले?, असा परखड सवालही त्यांनी विचारला.
कुंडलकर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले की, 'मराठी सिनेसृष्टीतील सर्व कलाकार तुमचे मामा आणि मावशी कसे काय? आणि त्यांच्या जाण्यानं रंगभूमी कशी पोरकी झाली?. जेव्हा मामा आजारी होते तेव्हा कोणी त्यांना भेटायला गेलं होतं का? जेव्हा रंगभूमीवरील सगळे मामा आणि मावशींचं निधन होईल तेव्हा उमेश कामत मामा असेल तर स्पृहा मावशी असेल आणि सई मावशी आणि या सगळ्यांनंतर अमेय वाघ मामा आणि पर्ण पेठे मावशी. रंगभूमी पोरकी झाली हे किती रटाळ वाक्य आहे, अशी उपरोधिक टीका त्यांनी केली होती.
या टीकेला अभिनेता जितेंद्र जोशी यांनी प्रत्युत्तर दिले. विजय चव्हाण यांना आम्ही ‘मामा’ म्हटलेलं तुम्हाला चालत नाही. परंतु, सुमित्रा भावेंना तुम्ही एकेरी नावाने हाक न मारता ‘मावशी’ म्हणता आणि महेश एलकुंचवारांचा उल्लेख महेश'दा' असा करता. आमच्या घरच्यांनी ज्याला आम्ही संस्कार असं म्हणतो त्यानुसार आमच्या घरी कामाला येणाऱ्या बाईला सुद्धा मावशी आणि रिक्शा टॅक्सीवाल्या वयस्कर गृहस्थाला अत्यंत सहजतेने काका/मामा म्हणतो आणि हे कुणीतरी बळजबरी केली म्हणून नव्हे तर तसा भाव आमच्या मनात प्रकट होतो आपोआप, असे जितेंद्र जोशीने फेसबुकवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
यानंतर अनेक मराठी कलाकारांनी या विषयावर परस्परविरोधी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मात्र, सचिन कुंडलकरांच्या पोस्टविषयी अनेकांनी नाराजीचा सूर लावला. त्यामुळे आता सचिन कुंडलकर यावर काय प्रतिक्रिया देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.