Janakrosh Morcha: मुंबईच्या सांताक्रूझमध्ये ठाकरे गटाने जनआक्रोश मोर्चा काढला होता. मुंबई महापालिकेच्या एच पूर्व प्रभाग कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला.अनियमित, अपुरा पाणीपुरवठा, दूषित पाणी यासंदर्भात नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. पण अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांच्या प्रश्नावर मार्ग निघाला नाही. यामुळे संतापलेल्या महिलांनी महापालिकेच्या ऑफिसवर धडक दिली.
माजी मंत्री अनिल परबांच्या नेतृत्त्वात मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेक-यांनी महापालिकेविरोधात घोषणाबाजी केली. आज स्थानिकांच्या प्रश्नावर आम्ही मोर्चा घेऊन आलो आहोत. आम्ही पालिका प्रशासनाला पंधरा दिवसांचा वेळ देतोय, स्थानिकांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावं, असी मागणी अनिल परब यांनी यावेळी केली.
या अगोदर मी दोन वेळा वॉर्ड ऑफिसरला भेटण्यासंदर्भात पत्र दिलं होतं पण आम्ही भेटायला येणार तर वॉर्ड ऑफिसर सुट्टीवर जातात. त्यामुळे आम्ही हा मोर्चा काढला, आताआम्ही त्यांना पंधरा दिवसांचा वेळ देतोय. या कालावधीत त्यांनी लवकरात लवकर तोडगा काढावा, असा इशारा यावेळी अनिल परब यांनी दिला.
'आमची शाखा तोडली. त्या शाखेवर बाळासाहेबांचा फोटो असताना देखील हातोडा मारला यावर शिंदे गटांचं म्हणणं काय? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी शिवसेना शिंदे गटावरदेखील निशाणा साधला.
जे विरोध करतायेत त्यांना येऊन सांगा, स्थानिक नागरिक आमच्या मोर्चात सहभागी आहेत,असेही ते यावेळी म्हणाले.
पंधरा दिवसात स्थानिकांचा प्रश्न सोडवला नाही तर अधिकाऱ्यांच्या घरचं पाणी आम्ही तोडू असा इशारा यावेळी देण्यात आला. तसेच जो कचरा विभागात साठेल तो कचरा अधिकाऱ्यांच्या घरासमोर नेऊन टाकू, मग त्यांना सामान्य शिवसैनिकांचा आणि नागरिकांचा दुःख कळेल, असेही यावेळी सांगण्यात आले.