मुंबई: मोदी सरकारचा बहुचर्चित शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर आता कोणत्या नेत्यांना महत्त्वाची खाती मिळणार, ही चर्चा सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने चक्क अमित शहा यांना गृह, संरक्षण किंवा अर्थ खाते देण्याची मागणी केली आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजप यांच्यात सत्तास्थापनेपासूनच संघर्ष पाहायला मिळाला होता. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमित शहांचा उल्लेख 'अफजलखान' असा केला होता. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये वितुष्ट आले होते.
मात्र, २०१९ च्या निवडणुकीची चाहुल लागल्यानंतर शिवसेना आणि भाजपने समेट करण्यात धन्यता मानली. लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांना याचा चांगला फायदाही झाला. यानंतर दोन्ही पक्षांनी जुन्या गोष्टी विसरून नवी सुरुवात केली आहे. विशेषत: शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर होणाऱ्या टीकेचा सूर भलताच मवाळ झाला होता.
शपथविधीवेळी पाचव्या रांगेत जागा दिल्याने शरद पवार नाराज
मोदी सरकारच्या शपथविधीनंतर पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय आला. या शपथविधीनंतर शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या 'सामना'तील अग्रलेखात अमित शहा यांच्यावर अक्षरश: कौतुकाचा वर्षाव करण्यात आला आहे. मोदी-२ सरकारचा चेहरा मोदी हाच आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील मोहरे काय करतात ते पाहायचे. नाहीतर अमित शहा यांचा चाबूक तेथे आहेच, असे सांगत शिवसेनेने अमित शहा यांचे वर्चस्व एकप्रकारे मान्य केले आहे.
तसेच अमित शहा यांना गृह, अर्थ किंवा संरक्षण यापैकी एखादे महत्त्वाचे खाते मिळावे, असेही शिवसेनेने म्हटले आहे. शहा यांनी संरक्षण खाते स्वीकारले तर पाकिस्तानचा प्रश्न कायमचा निकाली लागेल असा लोकांचा विश्वास आहे. त्यांनी गृह खाते स्वीकारले तर अयोध्येत राममंदिर सहज उभे राहील. शिवाय कश्मीरात ३७० कलम हटविण्याची घोषणा त्यांनी केली आहे, त्या कार्यास गती मिळेल. समान नागरी कायदा लागू व्हावा अशी अमित शहा यांची इच्छा होतीच. नक्षलवाद आणि माओवाद्यांचा हिंसाचार मोडून काढला जाईल, असे अग्रलेखात म्हटले आहे.
शहा हे अर्थमंत्री झाले तर विकासकामांना आणि आर्थिक सुधारणांना गती मिळेल. शेतकरी व कष्टकऱ्यांना लाभ मिळतील. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीच्या प्रयत्नांना गती मिळेल. मुख्य म्हणजे ‘डॉलर’च्या तुलनेत रुपयाची घसरण रोजच सुरू आहे. त्या घसरणीस खो बसेल. शहा यांच्या येण्याने मोदी सरकारला बळ मिळेल, अशा शब्दांत शिवसेनेने शहांचे कौतुक केले आहे.