मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव ९१ टक्के भरले

Updated: Aug 18, 2017, 11:06 AM IST
मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव ९१ टक्के भरले title=

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने तलाव तब्बल ९१ टक्के भरले असून, मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. गुरुवारपर्यंत सर्व तलावांमध्ये मिळून १३ लाख १६ हजार दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला आहे. 

यंदाचे वर्ष मुंबईकरांसाठी पाण्याच्या बाबतीत फायद्याचे ठरले आहे. यंदाच्या पावसात आतापर्यंत मुंबईसह तलावक्षेत्रात ५५ ते ६० टक्के इतका पाऊस झाला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी मोडकसागर, तानसा, तुळशी हे तलाव आतापर्यंत भरले असून मुंबईला दररोज १८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करणारा भातसा तलाव ८८.७९ टक्के भरला आहे. सर्व तलाव ओव्हरफ्लो होण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असून सध्या तलावात १३ लाख १६ हजार ७३४ दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा आहे.

मुंबईला दररोज ३,७५० दशलक्ष लिटर पाण्याची गरज असून ही तहान भागवण्यासाठी पालिकेला वर्षभर पाण्याचे नियोजन करावे लागते. ऑक्टोबरमध्ये सुमारे साडेचौदा दशलक्ष लिटर पाणीसाठा तलावांमध्ये जमा असल्यास पुढील वर्षभर कोणत्याही कपातीविना पुरवठा करता येईल.