'ही काय गंमत वाटली का?'; न्यायाधिशांनी फटकारल्यानंतर राणा दाम्पत्य कोर्टात होणार हजर

Hanuman Chalisa : मुंबईत माजी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर ‘हनुमान चालीसा’ पठणाचा इशारा दिल्यानंतर राणा दाम्पत्याने राजकीय नाटय घडून आले होते. त्यानंतर कोर्टातल्या अनुपस्थितीवरुन न्यायाधिशांनी राणा दाम्पत्याला फटकालं होतं.

आकाश नेटके | Updated: Aug 28, 2023, 12:56 PM IST
'ही काय गंमत वाटली का?'; न्यायाधिशांनी फटकारल्यानंतर राणा दाम्पत्य कोर्टात होणार हजर title=

Hanuman Chalisa Row : हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) प्रकरणात न्यायाधिशांनी फटकारल्यानंतर आता राणा दाम्पत्य कोर्टात हजर होणार आहे. खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हट्टाने हनुमान चालीसा पठण करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आज खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे मुंबई सत्र न्यायालयात (Bombay Session Court) हजर राहणार आहेत. 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याचा आग्रह धरल्याप्रकरणी राणा दाम्पत्याला 10 ऑगस्ट रोजी मुंबई सत्र न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु राणा दाम्पत्याने हजेरी लावली नव्हती. या प्रकरणी आज सुनावणी होणार आहे. याआधी राणा दाम्पत्य या खटल्याच्या सुनावणीवेळी न्यायालयात हजर राहिले नव्हते. या खटल्याची सुनावणी करणारे सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी राणा दाम्पत्याला खडसावत न्यायपालिका हा चेष्टेचा विषय नाही, असे म्हटलं होतं.

कोर्टातल्या गैरहजेरीवरुन न्यायाधीश राहुल रोकडे यांनी गंभीर दखल घेतली होती. लोकसभा अधिवेशनामुळे खासदार नवनीत यांची गैरहजेरी समजू शकतो पण रवी राणा गैरहजर का होते? असा सवाल  कोर्टाने उपस्थित केलो होता. गेल्या सुनावणीत राणा यांचे वकील रिझवान मर्चंटही गैरहजर होते. तसेच सरकारी वकील सुमेर पंजवानीही गैरहजर होते. त्यामुळे न्यायाधीशांनी तीव्र नाराजी व्यक्त करत 28 ऑगस्ट रोजी सर्वांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. पुढील सुनावणीच्या वेळी राणा दाम्पत्याने उपस्थित राहण्याचे आदेश देताना ही शेवटची संधी असल्याचे बजावले देखील होते. त्यानतंर आता राणा दाम्पत्य कोर्टात हजर होणार आहे.

गेल्या सुनावणीत न्यायाधिशांनी काय म्हटलं होतं?

"नवनीत राणा सध्या संसदेत असल्याने त्यांची अनुपस्थिती समजू शकते, पण रवी राणा यांनी हजर व्हायला हवे होते. या खटल्याच्या सुनावणीसाठी ना राणा दाम्पत्य हजर होते, ना त्यांच्या वतीने कोणताही वरिष्ठ वकील न्यायालयात हजर राहतो, ना या खटल्याशी संबंधित तपास अधिकारी. न्यायपालिका हा काही चेष्टेचा विषय नाही," अशी नाराजी न्यायाधिशांनी व्यक्त केली होती.

दरम्यान, मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचे जाहीर करून राणा दाम्पत्याने कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला. दोघांनी पोलिसांच्या कामात अडथळा आणल्याचा आरोपही राणा दाम्पत्यावर आहे. राणा दाम्पत्य सध्या जामिनावर बाहेर आहे. आवश्यक असेल तेव्हा सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची अट मान्य केल्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र आदेश देऊनही राणा दाम्पत्य अनेकदा सुनावणीसाठी अनुपस्थित राहिले नव्हते.