मुंबई : देशात भाजपला उतरती कळा लागली आहे. त्यामुळे पुन्हा देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सत्ता येणार नाही. लोकसभा निवडणुकीआधी देशात तीन राज्यांत सत्ता परिवर्तन झाले आहे. हे कशाचे धोतक आहे? तेथे काँग्रेसचे अस्तित्वच नव्हते. तेथे काँग्रेस सत्तेत आले, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हे भाष्य केले आहे. मोदींबाबत जनमाणसात चांगली प्रतिमा तयार केली गेली. भाजपची टीम त्यासाठी कामाला लागली होती. नरेंद्र मोदी म्हणजे विकास. गुजरातमध्ये मोदींने विकासाचे मॉडेल बनविले आणि जनमाणसामध्ये हे विकासाचे मॉडेल बिंबविण्याचा प्रयत्न केला गेला. तसा प्रचार केला गेला. धर्म, जातीचा विचार न करता विकास, विकास असे बिंबविण्यात भाजप आणि एनडीए यशस्वी झाले. त्यामुळे लोकांना वाटले मोदी म्हणजे विकास. विकास होणार याच जोरावर ते सत्तेत बसले. जनतेने काँग्रेस ऐवजी मोदींना संधी दिली. मात्र, त्यांनी काय विकास केला? लोकांना खोटी आश्वासने दिली. त्यामुळे तीन राज्यांत भाजपची हार झाली. हीच परिस्थिती लोकसभा निवडणुकीत दिसून येईल आणि भाजपला फारसे यश मिळणार नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान मोदी द्वेष पसरवत असल्याची टीका, पवार यांनी केली. 'झी २४ तास'चे मुख्य संपादक विजय कुवळेकर यांनी शरद पवार यांची विशेष मुलाखत घेतली. त्यात शरद पवारांनी नरेंद्र मोदींवर टीकेची झोड उठवली. मोदींच्या हातात देशाची सूत्रं असणे ही राष्ट्रीय आपत्ती आहे, असे सांगतानाच निवडणुकीनंतर परिवर्तन घडेल, असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला. सर्जिकल स्ट्राइकचे राजकारण करणे योग्य नाही, असेही ते म्हणाले. सर्जिकल स्ट्राईक आघाडीच्या काळातही केले गेले. मात्र त्याचं राजकारण करण्यात आले नाही याची जाणीवही पवारांनी या निमित्ताने करुन दिली.