Mumbai News: पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साथीचे आजारांचं प्रमाण वाढतं. या दिवसांत प्रत्येकाला काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. मुंबईमध्ये जूनपासून काही प्रमाणात पावसाला सुरुवात झाली असून या काळात साथीच्या आजारांच्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. जूनमध्ये पावसाला सुरुवात झाल्याने मुंबईमध्ये विविध साथीच्या आजारांचे तब्बल 1395 रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये गस्ट्रो आणि हिवतापाच्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचं समोर आलं आहे.
मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, मुंबईत जूनमध्ये विविध साथीच्या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. जूनमध्ये साथीच्या आजारांचे 1395 रुग्ण सापडले आहेत. यामध्ये गॅस्ट्रोचे सर्वाधिक 722 रुग्ण सापडले. त्याखालोखाल हिवतापाचे 443, कावीळ 99, डेंग्यू 93, लेप्टोस्पायरोसिस 28 आणि स्वाईन फ्लूचे 10 रुग्ण सापडले आहेत.
जानेवारी ते मे 2024 मध्ये मुंबईत विविध साथीच्या आजारांचे जवळपास 5697 रुग्ण आढळले होते. यामध्येही गॅस्ट्रोचे 3478 रुग्ण तर हिवतापाचे 1612 रुग्ण सापडले आहेत.
मुंबई महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी दक्षा शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, साथीच्या आजारांना रोखण्यासाठी यंदा एप्रिलपासून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या होत्या. परिणामी यंदा गतवर्षीच्या तुलनेत जूनमध्ये साथीच्या आजारांच्या रुग्णांच्या संख्येत घट झाली.
मुंबईत यंदा जूनमध्ये साथीच्या आजारांचे 1395 रुग्ण सापडले आहेत. मात्र गेल्या वर्षी जूनमध्ये साथीच्या आजारांच्या रूग्णांचा आकडा हा 3012 इतका होता. यामध्ये गॅस्ट्रोचे 1744, हिवताप 639, डेंग्यू 353, कावीळ 141, लेप्टो 97, स्वाईन फ्ल्यू 30, चिकनगुनिया 8 रुग्ण होते. त्यामुळे यंदाच्या वर्षी या रूग्णांमध्ये घट झाल्याचं दिसून आलं आहे.