शरद पवारांना कोणतीही नोटीस बजावली नाही- निवडणूक आयोग

निवडणूक आयोगाकडूनच अत्यंच महत्त्वाची माहिती देत....

Updated: Sep 23, 2020, 01:37 PM IST
शरद पवारांना कोणतीही नोटीस बजावली नाही- निवडणूक आयोग  title=
संग्रहित छायाचित्र

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मंगळवारी शरद पवार यांच्या नावावरुन राजकीय वर्तुळात वादळ आल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आयकर विभागाकडून नोटीस पाठवण्यात आल्याचं वृत्त अनेकांचं लक्ष वेधून गेलं आणि बऱ्याच चर्चांना वाव मिळाला. पण, आता मात्र निवडणूक आयोगाकडूनच अत्यंच महत्त्वाची माहिती देत पवारांना कोणत्याही प्रकारची नोटीस दिली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 

निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरुनच आयकर विभागानं शरद पवार यांच्या नावे नोटीस पाठवली होती असं वृत्त काही माध्यमांनी चालवलं. शरद पवार यांच्याकडून निवडणुकीच्या प्रतिज्ञपत्रात नमूद केलेल्या माहितीविषयी स्पष्टीकरण मागवण्यात आल्याचं यात म्हटलं गेल्याची माहिती समोर आली. पण, निवडणूक आयोगानं असा कोणताही इशारा दिला नसल्याचं आता स्पष्ट करण्यात आलं आहे.

२००९, २०१४ आणि २०१९ या निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत ही नोटीस असल्याचं म्हटलं गेलं होतं. नोटीस आल्याच्या मुद्द्यावरुन पवारांनी पत्रकार परिषदेत यावर प्रतिक्रियाही दिली होती. 

'सुप्रियालाही काल संध्याकाळी नोटीस येणार होती. मात्र, पहिली नोटीस मलाच आली, हे चांगले झाले. निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरून आयकर विभागाने ही नोटीस पाठवल्याचे मला समजले. संपूर्ण देशात आमच्यावर विशेष प्रेम आहे, याचा मला आनंदच', अशी खोचक टिप्पणी पवारांनी केली होती. पण, आता मात्र निवडणूक आयोगानंच अशी नोटीस पाठवल्याचं वृत्त नाकारल्यामुळं यासंबंधीच्या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला आहे.