Cyrus Mistry : टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूच्या तीन महिन्यांनंतर महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अपघातावेळी गाडी चालवणाऱ्या स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर अनाहिता पंडोल (anahita pandole) या प्रकरणात मुख्य आरोपी आहेत. पालघर पोलिसांनी शुक्रवारी अनाहिता पंडोले यांच्याबाबत केलेल्या खुलाशाने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी सांगितले की गाडी चालवताना पंडोले यांनी सीटबेल्ट (seat belt) नीट लावला नव्हता. सायरस मिस्त्री आणि त्यांचे मित्र जहांगीर पंडोले यांचा 4 सप्टेंबर 2022 रोजी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघर येथे कार अपघातात मृत्यू झाला होता. दोघेही मर्सिडीजमध्ये मागे बसले होते. तर अनाहिता या गाडी चालवल होत्या. अनाहिता यांच्यासोबत पुढे त्यांचे पती डेरियस पंडोले बसले होते.
अनाहिता पंडोले यांनी याआधीही अनेकवेळा वेगमर्यादेचे उल्लघंन केल्याची माहिती आता समोर आहे. पोलिसांनी याप्रकरणी पंडोले यांच्याकडून सात वेळा दंड देखील वसूल केल्याची माहिती पालघर पोलिसांनी दिली आहे.
अनाहिता पंडोल यांच्यावर रुग्णालयात उपचार
"मर्सिडीज बेंझ कार चालवणाऱ्या डॉ. अनाहिता यांनी सीट बेल्ट नीट लावला नव्हता. अनाहिता यांनी मागून फक्त शोल्डर हार्नेस घातला होता आणि लॅप बेल्ट लावला नव्हता. हे निष्कर्ष आरोपपत्रात लावण्यात आले असून ते न्यायालयात दाखल करणार आहेत. अपघातात जखमी झालेल्या अनाहिता यांच्यावर सध्या मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांना काही दिवसांतच डिस्चार्ज मिळणार आहे," अशी माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली.
पंडोल यांच्याकडून वारंवार नियमांचे उल्लंघन
"अनाहिता पंडोल या सातत्याने वाहतुकीचे नियम मोडत आल्या आहेत. 2020 पासून आतापर्यंत त्यांना अनेकदा अतिवेगाने गाडी चालवण्यामुळे दंड भरावा लागला आहे. डॉ. अनाहिता या 2020 पासून 2022 सप्टेंबरमध्ये कमीत कमी सात वेळा भरधाव वेगात गाडी चालवताना स्पीड कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. आता त्यांना लावण्यात आलेल्या दंडाचा आरोपपत्रामध्येही उल्लेख करण्यात आला आहे," असे बाळासाहेब पाटील म्हणाले. तसेच लवकर या प्रकरणी आरोपपत्र दाखल करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पंडोल यांच्याविरुद्ध भादवि नुसार विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
अपघात कसा झाला?
मुंबई अहमदाबाद महामार्गावरुन सायरस मिस्त्री हे पंडोल यांच्या कुटुंबियांसोबत मर्सिडीज कारने येत होते. पालघरच्या चारोटी टोल नाक्याजवळील सूर्या नदीच्या पुलाच्या कठड्याला मिस्त्री यांच्या भरधाव कारची धडक बसली. त्यावेळी मागे बसलेल्या मिस्त्री आणि जहांगीर पंडोल यांचा मृत्यू झाला. यावेळी मिस्त्री यांनी सीटबेल्ट लावला नव्हता. मात्र एअर बॅग उघडल्यानंतरही मिस्त्री पुढे फेकले गेले आणि त्यांना मार बसला. यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.