मुंबई: अजित पवार भाजपच्या गोटात दाखल झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांपैकी एक मानले जाणारे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी सोमवारी आपले मौन सोडले. यावेळी धनंजय मुंडे यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ असल्याचे स्पष्ट केले. अजित पवार यांनी भाजपसोबत जात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यादिवशी मी दुपारी एक वाजेपर्यंत झोपलो होतो. मला या सगळ्याबद्दल काहीच माहिती नव्हते. त्यामुळेच मी त्यादिवशी पक्षाच्या बैठकीला उशीरा पोहोचलो. अजित पवारांबद्दल माझ्या मनात प्रेम असले तरी माझी अंतिम निष्ठा ही शरद पवार यांच्याशीच असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.
अजित पवार यांनी शनिवारी सकाळी सगळ्यांनाच धक्का देत राजभवनात जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यावेळी त्यांनी राजभवनावर आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनाही नेले होते. या आमदारांना धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर उपस्थित राहण्याच्या सूचना मिळाल्या होत्या. यानंतर त्यांना राजभवनावर नेण्यात आले होते. राजभवनावर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी पार पडल्यानंतर या सगळ्या प्रकाराचा उलगडा झाला होता. या सगळ्यामुळे धक्का बसलेले काही आमदार थेट शरद पवार यांच्या घरी पोहोचले होते.
त्यांनी हा सगळा घटनाक्रम पवारांना सांगितला. त्यावेळी धनंजय मुंडे यांच्या बंगल्याचा उल्लेख आला. विशेष म्हणजे यानंतर बराच वेळ धनंजय मुंडे नॉट रिचेबल असल्याने ते अजित पवार यांच्यासोबत गेल्याची चर्चा होती. मात्र, दुपारच्या सुमारास धनंजय मुंडे यशवंतराव चव्हाण सेंटर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला पोहोचले होते. मात्र, तरीही धनंजय मुंडे यांच्या भूमिकेविषयी साशंकता व्यक्त केली जात होती.
या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे आज प्रसारमाध्यमांना सामोरे गेले. यावेळी त्यांनी म्हटले की, अजित पवार पक्षातून बाहेर पडेपर्यंतच माझा त्यांच्याशी संबंध होता. यानंतर मी त्यांच्या संपर्कात नाही. माझ्या बंगल्यावर त्यादिवशी काय झाले हे मलाच माहिती नाही. माझ्या बंगल्यावर नेहमीच गर्दी असते. कधीकधी तर त्याला बस स्टॉपचे स्वरुप येते, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.