मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत मुंबईत पोहचली. Y प्लस, कडक सुरक्षा व्यवस्थेत कंगनाला मुंबई विमानतळावरुन सुरक्षित तिच्या खार येथील घरी पोहचवण्यात आलं. कंगना मुंबईत उतरल्यानंतर, विमानतळाबाहेर एकीकडे तिच्या समर्थनार्थ तर दुसरीकडे कंगनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यादरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, यापूर्वी महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधीही न झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
बीएमसीकडून कंगनाच्या कार्यालयावर कारवाई करण्यात आली. त्याबाबत बोलताना फडणवीस यांनी बदल्याच्या भावनेने केलेली कारवाई योग्य नसल्याचं म्हटलं आहे. 'आपल्या विरोधात बोलणाऱ्यांना, रस्त्यावर थांबवून मारणार आणि सरकारच्या पाठिंब्याने हे होईल, महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधीही झालं नसल्याचं' फडणवीस म्हणाले.
'सरकार ज्याप्रकारे कारवाई करत आहे, त्यामुळे महाराष्ट्राचा देशात अपमान होत आहे. जर अनधिकृत बांधकाम असेल, तर कारवाई जरुर व्हावी, परंतु सर्वांसोबत ही कारवाई झाली असती तर ती योग्य असती. एखाद्याने तुमच्याविरोधात काही म्हटलं, त्यामुळे कारवाई केली जात असेल, तर ती बदल्याची भावना आहे, महाराष्ट्रात अशा प्रकारच्या भावनेचा सन्मान होणार नाही', अशा शब्दांत फडणवीसांनी टीका केली आहे.
दरम्यान, कंगनाविरोधात शिवसेना आक्रमक झाली असताना, मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली आहे. कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकाम दाखवत पालिकेने त्यावर हातोडा चालवला.