विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्यास विलंब; राजकीय पक्षांमध्ये अस्वस्थता

आज आचारसंहिता लागू होईल अशी शक्यता होती.

Updated: Sep 20, 2019, 07:08 PM IST
विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्यास विलंब; राजकीय पक्षांमध्ये अस्वस्थता title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर व्हायला विलंब होत असल्याने राज्यातील राजकीय पक्षांमध्ये विशेषतः विरोधी पक्षांमध्ये अस्वस्थता आहे. २०१४ साली १२ सप्टेंबर रोजीच निवडणुकीची तारीख जाहीर होऊन राज्यात आचारसंहिता लागली होती. 

मात्र २०१४ च्या निवडणूक जाहीर होण्याची तारीख लक्षात घेता मागच्या तुलनेत तारीख जाहीर व्हायला १० दिवसांचा विलंब झाला आहे. पंतप्रधानांचा नाशिक दौरा आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज आचारसंहिता लागू होईल अशी शक्यता होती. मात्र आजही तारीख जाहीर झालेली नाही. 

दुसरीकडे राज्य सरकारने मागील दोन दिवसात तब्बल २८१ निर्णय जारी केले आहेत. यात १८ सप्टेंबर रोजी १२२ आणि १९ सप्टेंबर रोजी १५९ निर्णय जारी करण्यात आले आहेत. तर आजच्या निर्णयांची संख्या रात्री उशीरा उपलब्ध होईल. आपल्या जवळच्या लोकांना फायदा मिळवून देण्यासाठी जास्तीत जास्त निर्णय घेता यावेत यासाठी आचारसंहितेच्या तारखा लांबवल्या जात असल्याचा आरोप याप्रकरणी विरोधकांनी केला आहे.