मुंबई : मुंबईतील क्रॉफर्ट मार्केटमध्ये देशी आणि विदेशी फळांचा मोठा बाजार असतो. सफरचंदवर मेणाचे कोटींग असल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर झी मीडियाकडून सफरचंदवर मेणाचे कोटिंग आहे की नाही? याबाबत अधिक माहिती घेण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, बाजारात विक्रीसाठी असलेले सफरचंद वॉशिंग्टनहून मुंबईत येतात. दिसताना अतिशय चकचकित आणि आकर्षक दिसणाऱ्या सफरचंदचा होलसेल भाव जवळपास २८० ते ३०० रुपये प्रति किलो आहे.
चकचकीत सफरचंदवर मेणाचे कोटिंग आहे की नाही? हे तपासण्यासाठी अतिशय सोपी पद्धत आहे. हलक्या हाताने सफरचंदवर चाकूने स्क्रॅच करा. त्यावर मेण असल्यास मेणाचे कोटिंग दिसू लागते.
परंतु, हे मेण नसून याचे सेवन केले जाऊ शकते असे फळ विक्रेत्यांचे म्हणणे आहे. हे खाण्यालायक असून अमेरिकेहून लांब प्रवास करुन येत असल्याने त्यावर preservative म्हणून हा थर लावण्यात येत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
परंतु विक्रेत्यांचा हा दावा योग्य आहे की अयोग्य, हे फळांचे नमुने तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविल्याशिवाय सांगणे कठीण आहे.
फळ विक्रेत्यांचे म्हणणे आहे की, ते सफरचंदवर स्वत: मेणाचा थर लावत नाही. तर येतानाच सफरचंद पॉलिश करुन येतात. मात्र आता हे कोणत्या प्रकारचे मेण आहे आणि किती धोकादायक आहे? हा मोठा प्रश्नच आहे.