मुंबई : महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी दिली आहे. ३१ मार्च २०२० अखेर राज्य सरकारकडून १८ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा करण्यात आले आहेत. एकूण ११ हजार ९६६ कोटी २१ लाखांची निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे.
BreakingNews । राज्य सरकारकडून १८ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा, एकूण ११ हजार ९६६ कोटी २१ लाखांची निधी शेतकऱ्यांच्या खात्यात@CMOMaharashtra @ShivSena @OfficeofUT @AjitPawarSpeaks @AshokChavanINC @ashish_jadhao #Farmers pic.twitter.com/rVX8esFce5
— ZEE २४ तास (@zee24taasnews) April 1, 2020
राज्यातील जिल्हा सहकारी बँकांच्या माध्यमातून १० लाख ४० हजार ९३५ शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार ४०७ कोटी १३ लाखांचा निधी जमा करण्यात आला आहे. तर व्यापारी बँकांच्या माध्यमातून ८ लाख ४८ हजार ५९३ शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार ५५९ कोटी ८० हजार रूपये जमा करण्यात आलेत. त्यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळाला आहे.
निवडणुकीच्या तोंडावर कर्जमाफीची घोषणा शिवसेनेकडून करण्यात आली होती. तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेही शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे संकट दूर करण्याचे आश्वासन दिले होते. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर कर्जमाफी देण््यासाठी हालचाली सुरु केल्या होत्या. त्यानुसार राज्य सरकारने ३१ मार्चपर्यंत राज्यातल्या १८ लाख ८९ हजार ५२८ शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीच्या रूपात निधी जमा केलाय. एकूण ११ हजार ९६६ कोटी २१ लाख रूपयांचा निधी जमा करण्यात आला.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ,राज्य सरकार, शेतकऱ्यांकडून दररोज दहा लाख लिटर दूधाची २५ रुपये प्रतिलिटर दरानं खरेदी करणार आहे. येत्या चार-पाच दिवसात हे संकलन सुरु होईल आणि पुढचे दोन महिने ही खरेदी सुरु राहील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. या दुधाची भूकटी करुन ती साठवली जाईल, नंतर त्याची ऑनलाईन विक्री केली जाईल. राज्य दूध महासंघाच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात येणार आहे.