मुंबई: सध्या राज्याचा कारभार अजित पवार चालवत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फेसबुक लाईव्ह करण्यात मग्न आहेत, अशी बोचरी टीका भाजप आमदा नितेश राणे यांनी केली आहे. नितेश यांच्या या ट्विटमुळे शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपण्याची शक्यता आहे.
राज्यात महाविकासआघाडीची सत्ता आल्यानंतर अजित पवार हेच सर्व निर्णय घेतात. ते मुख्यमंत्री असल्यासारखेच वागतात, अशी वक्तव्ये करून भाजप नेत्यांनी अनेकदा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. आता नितेशी राणे यांनीही त्याचीच री ओढत शिवसेनेला डिवचले आहे. नितेश यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय मागे घेतल्याबद्दल अजित पवार यांचे आभार. गेल्या काही दिवसांमधील परिस्थिती पाहता तुम्हीच राज्याचा कारभार चालवत आहात, हे पुन्हा एकदा दिसून आले. शेवटी अनुभव महत्त्वाचा असतो. इतरजण केवळ फेसबुक लाईव्ह करण्यात बिझी आहेत, असा टोला नितेश यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
Thank u @AjitPawarSpeaks saheb for taking back the decision of not cutting salaries of police men n health workers
After all experience always speaks n u have shown that ur running the state indeed while others r busy doing FB lives— nitesh rane (@NiteshNRane) March 31, 2020
गेल्या काही दिवसांत महाविकासआघाडीतील राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष तुरळक अपवाद वगळताना समन्वय राखून काम करताना दिसत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सुरुवातीच्या दिवसांत सातत्याने पत्रकारपरिषदा घेऊन जनतेला आश्वस्त करण्याचे काम केले. सध्यादेखील उद्धव ठाकरे सातत्याने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत. अनेकांनी उद्धव ठाकरे यांच्या या कार्यपद्धतीचे कौतुकही केले होते.