कोरोना काळातही शाळेत विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा घेण्याचा घाट, विरारच्या इंग्लिश स्कूलचा प्रताप

सिव्हिल युनिफॉर्मवर विद्यार्थ्यांना बोलावले शाळेत, शिक्षण विभागाकडून याप्रकराची चौकशी सुरू 

Updated: Aug 2, 2021, 04:21 PM IST
कोरोना काळातही शाळेत विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा घेण्याचा घाट, विरारच्या इंग्लिश स्कूलचा प्रताप title=
प्रतिनिधिक फोटो

विरार : राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या नियंत्रणात येत असताना तिसऱ्या लाटेचा धोका अजूनही टळलेला नाही. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. हे आदेश असतानाही एका खासगी शाळेनं मात्र या आदेशांना केराची टोपली दाखवण्याचा प्रकार केल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुंबई उपनगरात हा प्रकार घडला आहे. 

कोरोनामुळे राज्यात शाळा बंद ठेवण्याचे आदेश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत.मात्र असं असलं  तरी काही शाळा शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून शाळेत विद्यार्थ्यांची गर्दी करताना  दिसत आहेत. विरार पश्चिमेकडील एका  इंग्लिश विद्यालयाकडून आज शाळेत ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना  लेखी परीक्षेसाठी बोलाविण्यात आले होते. 

कोरोनामुळे मुलांचे शिक्षण व परीक्षा या ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्या तरी या शाळाप्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा घेण्यात आल्या आहेत. शाळेच्या या भूमिकेमुळे विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाल्यास कोण जवाबदार राहणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.  

तर एक ते दीड वर्षांपासून शाळकरी मुले वंचित असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा घेत असल्याचे कारण शाळा व्यवस्थानाकडून देण्यात आलं आहे.  या प्रकाराबाबत शिक्षक विभागाकडे विचारणा केली असता त्यांनी. या प्रकाराची चौकशी करून कारवाई करणार असल्याचे शिक्षण अधिकारी माधवी तांडेल यांनी सांगितलं आहे.