कोरोनाचे संकट : केंद्र सरकारने २५ हजार कोटींचे पॅकेज द्यावे - अजित पवार

 ‘कोरोना’चा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला २५ हजार कोटींचे विशेष पॅकेज द्यावे.

Updated: Mar 31, 2020, 08:15 AM IST
कोरोनाचे संकट : केंद्र सरकारने २५ हजार कोटींचे पॅकेज द्यावे - अजित पवार title=
संग्रहित छाया

मुंबई : ‘कोरोना’चा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला २५ हजार कोटींचे विशेष पॅकेज द्यावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. केंद्र सरकारला पत्र पाठवून अजित पवारांनी ही मागणी केली आहे. केंद्र सरकारकडे महाराष्ट्राची १६ हजार ६५४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत ही थकबाकी मिळावी, अशी मागणीही त्यांनी पत्रात केली आहे. याप्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि प्रकाश जावडेकर यांनी अधिक लक्ष घालावे याकडे अजित पवार यांनी लक्ष वेधले आहे.

दरम्यान, राज्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शहरातून कोरोना ग्रामीण  भागाच्या वेशीपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे राज्यशासनाला ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. अशावेळी केंद्र सरकारने आर्थिक मदत करण्याची गरज आहे, अशी मागणी राज्याकडून आता होऊ लागली आहे. होम क्वारंटाईन असणाऱ्यांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन सातत्याने करण्यात येत आहे.

कोरोना व्हायरसमुळे महाराष्ट्रात १०वा मृत्यू झाला आहे. ८० वर्षांच्या एका कोरोनाग्रस्त रुग्णाने मुंबईच्या खासगी रुग्णालयात प्राण सोडले. महाराष्ट्रातमध्ये आता कोरोनाचे एकूण २१६ रुग्ण झाले आहेत. तर ३९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याआधी आज सकाळी पुण्यामध्ये एका ५२ वर्षांच्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पुण्यातली कोरोनामुळे मृत्यू व्हायची ही पहिलीच घटना आहे. कोरोनामुळे मुंबईच्या केईएम रुग्णालयात एका ४० वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला होता. तर बुलडाण्यामध्ये एका ४५ वर्षांच्या व्यक्तीला कोरोनामुळे जीव गमवावा लागला होता. कोरोनाचा राज्यातला मुंबई बाहेरचा हा पहिलाच मृत्यू होता.

मुंबईमध्ये कोरोनाचे ९० रुग्ण आहेत, तर पुण्यात ४२, सांगलीमध्ये २५, ठाणे जिल्ह्यात २३, नागपूरमध्ये १६, यवतमाळ ४, अहमदनगर ५, सातारा २, कोल्हापूर २, औरंगाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, जळगाव, नाशिक, बुलडाण्यामध्ये प्रत्येकी १ रुग्ण सापडला आहे. दर भारतामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १०७१ पर्यंत पोहोचली आहे. आतापर्यंत भारतात कोरोनामुळे २९ जणांचा मृत्यू झाला आहे. मागच्या २४ तासांमध्ये कोरोनाचे ९२ नवे रुग्ण आढळले, तर ४ जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.