कोरोनाग्रस्तांच्या अंत्यसंस्कारासाठी कठोर नियमावली

महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

Updated: Mar 30, 2020, 09:27 PM IST
कोरोनाग्रस्तांच्या अंत्यसंस्कारासाठी कठोर नियमावली title=

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाचे २२० रुग्ण झाले आहेत. मुंबईमध्ये कोरनाच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक म्हणजेच १२६ एवढी झाली आहे. कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. यातले ८ रुग्ण हे मुंबईतले आहेत.

कोरोनाग्रस्तांच्या अंत्यसंस्कारासाठी मुंबई महापालिकेने कठोर नियमावली बनवली आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांचे अंत्यसंस्कार रुग्णालयाजवळील स्मशानभूमीत करण्यात येतील. तसंच कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून मृतदेहाला स्पर्श करण्यास मनाई करण्यात आली आहे.

कोरोनाग्रस्त मृतदेह दफन करण्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत. जर मृतांच्या नातेवाईकाने दफन करण्याची मागणी केली, तर त्याला मुंबई शहराच्या बाहेर जाऊन कोविड-१९ नियमांचे पालन करावे लागणार आहे.

कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृतदेह घरी घेऊन जाता येणार नाही. मृतदेहाला रुग्णालयातून थेट स्मशानभूमीत नेऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. तसंच अंत्यसंस्कारासाठी ५ पेक्षा जास्त रुग्ण उपस्थित राहू शकणार नाहीत.

मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाने जुन्या नियमावलींवर आक्षेप घेतल्यामुळे यामध्ये बदल करण्यात आले. नव्या नियमावलीनुसार मृताच्या कुटुंबियांना मृतदेह दफन करायचा असेल, तर तो दफन करता येईल, पण कोरोना व्हायरस आजूबाजूला पसरणार नाही, एवढी मोठी दफनभूमी असावी, असं या नियमावलीमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.