कोरोना : दोन विभागांत रुग्‍ण दुप्‍पट होण्‍याच्‍या कालावधीने गाठले शतक

८ विभागांमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीने गाठले अर्धशतक

Updated: Jun 27, 2020, 04:54 PM IST
कोरोना : दोन विभागांत रुग्‍ण दुप्‍पट होण्‍याच्‍या कालावधीने गाठले शतक title=

मुंबई : 'कोरोना कोविड १९' या संसर्गजन्य आजारास प्रतिबंध करण्यासाठी बृहन्मुंबई महापलिकेद्वारे सातत्याने व सुनियजित पद्धतीने अव्याहत प्रयत्न करण्यात येत असून या प्रयत्नांना यश येत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. या उदाहरणांमध्ये आणखी एका उदाहरणाची नुकतीच भर पडली आहे. यानुसार बृहन्मुंबई महापालिकेच्या ‘एच पूर्व’ व ‘एफ उत्तर’ या दोन प्रशासकीय विभागांमध्ये रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीने नुकताच १०८ दिवसांचा टप्पा गाठत शतकपूर्ती केली आहे. विशेष म्हणजे उपलब्ध माहितीनुसार महापालिका क्षेत्रांचा विचार केल्यास रुग्ण दुपटीचा कालावधी १०० दिवसांपेक्षा अधिक असणारे हे देशातील हे बहुदा एकमेव उदाहरण असावे.

कोविड प्रतिबंधासाठी महापलिकेने सातत्याने राबविलेल्या सर्वस्तरीय उपाययोजना आणि त्या उपाययोजनांना मिळालेली नागरिकांची अत्यंत मोलाची परिणामकारक साथ यामुळेच हे शक्य झाले आहे.

शतक गाठणारे विभाग

कोरोना कोविड – १९' या आजाराच्या संसर्गाचे संख्यात्मक विश्लेषण करताना, त्यात रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीची आकडेवारी अत्यंत महत्त्वाच्या मानली जाते. रुग्ण दुप्पट होण्याचे दिवस म्हणजेच कालावधी जेवढा अधिक तेवढी सदर बाब अधिक सकारात्मक असल्याचे निदर्शक असते. यानुसार बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील वांद्रे पूर्व, खार पूर्व इत्यादी भागांचा समावेश असणाऱ्या 'एच पूर्व' विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीने शतकपूर्ती करत १०८ दिवसांचा टप्पा गाठला आहे. त्याचबरोबर माटुंगा, वडाळा या परिसरांचा समावेश असणाऱ्या 'एफ उत्तर' विभागाने देखील रुग्ण दुपटीच्या कालावधीचा १०८ चा टप्पा नुकताच गाठलेला आहे.

अर्धशतक गाठणारे विभाग

वरील व्यतिरिक्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या इतर आठ विभागातील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीने ५० दिवसांचा टप्पा पार करीत अर्धशतक गाठण्यात यश मिळविले आहे. यामध्ये 'एम पूर्व' विभाग (मानखुर्द - गोवंडी) ७९ दिवस, 'इ' विभाग (भायखळा) ७७ दिवस, 'एल' विभाग (कुर्ला) ७३ दिवस, 'बी' विभाग (सॅंडहर्स्ट रोड) ७१ दिवस, 'ए' विभाग (कुलाबा - फोर्ट) विभाग ७० दिवस, 'एम पश्चिम' (चेंबूर) ६१ दिवस, 'जी उत्तर' (दादर) ६१ दिवस आणि 'जी दक्षिण' (वरळी - प्रभादेवी) परिसराच्या ५६ दिवसांनी रुग्ण संख्या दुप्पट होण्याच्या कालावधीचा समावेश आहे. तर बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व २४ विभागांच्या आकडेवारीचा एकत्रित विचार केल्यास बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीचे सरासरी प्रमाण हे ४१ दिवस इतके आहे.

कोविड प्रतिबंधासाठी यशस्वीपणे राबविलेल्या उपाययोजना

महापालिका आयुक्त श्री इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात बृहन्मुंबई महापालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने विविध स्तरीय उपायोजना अव्याहतपणे राबविण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने 'चेज द वायरस' याअंतर्गत बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा अत्यंत प्रभावीपणे शोध घेत संबंधित व्यक्तींचे अलगीकरण करण्यासह सुनिश्चित कार्यपद्धतीची काटेकोरपणे अंमलबजावणी नियमितपणे करण्यात येत आहे.

सार्वजनिक शौचालयांचे सातत्याने निर्जंतुकीकरण

झोपडपट्टी परिसरांसह इतर परिसरात असणाऱ्या सार्वजनिक शौचालयांचा होत असलेला वापर आणि त्यामुळे संसर्गाची संभाव्यता लक्षात घेत महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक शौचालयांचे सातत्याने निर्जंतुकीकरण दिवसातून अनेकदा करण्यात येत आहे. त्याचबरोबर सार्वजनिक शौचालयांमध्ये साबण, सॅनिटायझर यासारख्या बाबी यथायोग्य प्रमाणात उपलब्ध असतील याकडेही काळजीपूर्वक लक्ष पुरविण्यात येत आहे.

मुंबई पोलिसांच्या सहकार्याने कंटेनमेंट झोनची सुनियोजित अंमलबजावणी

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील जे परिसर 'कंटेनमेंट झोन' म्हणून घोषित करण्यात आले, त्याठिकाणी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. यामध्ये परिसरातील नागरिकांच्या स्तरावर नियमितपणे जाणीवजागृती करणे, नागरिकांना यांच्या परिसरात बाहेर पडण्याची गरज भासू नये यासाठी यथायोग्य सर्व दक्षता घेण्यासही जीवनावश्यक बाबींची उपलब्धता त्याच परिसरात करून देण्याबाबतची कार्यवाही करणे इत्यादी बाबींची परिणामकारक अंमलबजावणी सातत्याने करण्यात येत आहे.

विदेशातून किंवा बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करणे व विलगीकरण करणे

विदेशातून किंवा बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी ही केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या सुनिश्चित कार्यपद्धतीनुसार व वैद्यकीय उपचार क्रमानुसार (मेडिकल प्रोटोकॉल) नियमितपणे व काटेकोरपणे करवून घेण्यात येत आहे. तसेच याबाबत आवश्यक त्या प्रकरणी संबंधित व्यक्तींचे परिणामकारक विलगीकरण करण्याच्या दृष्टीने हॉटेल, लॉजेस इत्यादींच्या स्तरावर समन्वय साधून आवश्यक ती व्यवस्थाही सातत्याने करण्यात येत आहे. त्याचबरोबर मुंबईतून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचीही वैद्यकीय तपासणी सुनिश्चित कार्यपद्धतीनुसार करणे; विविध कार्यालयांच्या स्तरावर आणि परिसरात मोहीम पद्धतीने नागरिकांचे तापमान व प्राणवायूची पातळी मोजणे इत्यादी बाबी नियमितपणे करण्यात येत आहेत. त्याचबरोबर ज्यांना को कोविडचा अधिक धोका संभवतो अशा गटातील नागरिकांची तपासणी करण्यासाठी विविध परिसरांमध्ये विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक, मधुमेह असलेले नागरिक, रक्तदाबाचा - हृदयविकाराचा त्रास असणारे नागरिक इत्यादी 'को माॅर्बीड' गटातील नागरिकांची तपासणी करण्याची मोहीम राबविणे इत्यादी बाबी नियमितपणे करण्यात येत आहेत.

बाधितांवर परिणामकारक वैद्यकीय उपचार

'कोरोना कोविड १९' या संसर्गजन्य रोगाची बाधा झालेल्या व्यक्तींना परिणामकारक वैद्यकीय उपचार व्हावेत, याकरिता मोठी क्षमता असलेली उपचार केंद्रे महापालिकेद्वारे आणि इतर काही संस्थांच्या सहकार्याने विविध ठिकाणी उभारण्यात आली व सुरू करण्यात आली. त्याचबरोबर महापालिका क्षेत्रातील सर्व खाजगी व शासकीय रुग्णालयांमध्ये तसेच महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये देखील कोविड विषयक उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली. तसेच बाधित रुग्णांना आवश्यक ते वैद्यकीय औषधोपचार वेळेत मिळावेत, याकरिता त्यांना वेळच्या वेळी रुग्णालयांमध्ये किंवा उपचार केंद्रांमध्ये 'बेड' मिळणे गरजेचे आहे; ही बाब लक्षात घेऊन महापालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये विभागस्तरीय 'वॉर रूम' सुरु करण्यात आल्या आहेत. दिवसाचे चोवीस तास अव्याहतपणे सुरू असलेल्या या वाॅर रूम मध्ये संगणकीय डॅशबोर्ड कार्यान्वित करण्यात आला आहे. आयआयटी मुंबईच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या या डॅशबोर्डवर बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व कोविड खाटांची उपलब्धता ही सातत्याने अद्ययावत होत असते. ज्यामुळे रुग्णांना त्यांच्या घरापासून जवळ असणाऱ्या परिसरात व ज्या ठिकाणी खाटांची उपलब्धता असेल त्या रुग्णालयात वैद्यकीय उपचारांसाठी दाखल होण्याची कार्यवाही तात्काळ करण्यात येत आहे. या सर्व बाबींमुळे बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील कोविड रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी सातत्याने वाढत आहे. ही बाब समस्त मुंबईकरांना निश्चितच दिलासा देणारी आहे. 

मुंबईकरांचे सहकार्य अत्यंत मोलाचे

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात ११ मार्च २०२० रोजी कोविडचा पहिला रुग्ण आढळून आला होता. 'संसर्गजन्यता'ही तुलनेने अधिक असणा-या कोविड या आजाराला प्रतिबंध करणे, ही बाब लोकसंख्येची घनता अधिक असणा-या बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रासारख्या परिसरापुढे मोठे आव्हानच होते व आहे. तथापि, या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाद्वारे सर्वस्तरीय प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देतानाच वैदयकीय उपचार विषयक आवश्यक ती कार्यवाही देखील सातत्यपूर्ण पद्धतीने केली जात आहे. तसेच या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे वेळोवेळी करण्यात आलेल्या आवाहनांना अतिशय सकारात्मक प्रतिसाद देऊन सहकार्य केले आहे. त्यामुळेच बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील कोविड संसर्गास अधिकाधिक प्रतिबंध करण्यास बळ मिळाले आहे. मुंबईकरांचे हे सहकार्य यापुढेही असेच कायम राहील व वृद्धिंगत होईल; असा विश्वास बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने यानिमित्ताने व्यक्त केला आहे.