पक्ष प्रवेशाचा गोंधळ टाळण्यासाठी समन्वय समिती, महाविकास आघाडीचा मोठा निर्णय

एकमेकांचे कार्यकर्ते फोडले जात असल्याने आघाडीत नाराजी होती, काही नेत्यांनी ही नाराजी बोलूनही दाखवली होती

Updated: Jul 12, 2021, 10:47 PM IST
पक्ष प्रवेशाचा गोंधळ टाळण्यासाठी समन्वय समिती, महाविकास आघाडीचा मोठा निर्णय  title=

मुंबई : एकमेकांचे पदाधिकारी, नेते यांच्या पक्ष प्रवेशाचा गोंधळ टाळण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आलीय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हा निर्णय घेतलाय. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षात कुणालाही प्रवेश देताना ही समिती चर्चा करणार आणि एकमेकांना विश्वासात घेणार आहे. 

या समितीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचा समावेश करण्यात आलाय. तीनही पक्षांच्या नेत्यांना एकमेकांच्या पक्षात प्रवेश देताना एकमेकांना विश्वासात घेतलं जाईल अशी सूत्रांची माहिती आहे. 

एकमेकांचे कार्यकर्ते फोडले जात असल्याने आघाडीत नाराजी होती. काही नेत्यांनी ही नाराजी बोलूनही दाखवली होती. हा गोंधळ अधिक वाढू नये यासाठीतिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांचा समावेश असलेली समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. 

काही दिवसांपूर्वीच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. 'काँग्रेस-राष्ट्रवादीकडून दुसऱ्या पक्षाचे नेते, कार्यकर्ते फोडण्यापेक्षा शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते फोडत असल्याचं चित्र दिसत आहे. आपला पक्ष कमकुवत करत असेल तर या स्थितीत पुन्हा भाजपशी जुळवून घेतेलेले बरे, असं माझे वैयक्तिक मत आहे' असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं होतं.