काँग्रेसचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना आणखी मदत देऊ- अशोक चव्हाण

राज्यपालांनी जाहीर केलेली मदत तुटपुंजी

Updated: Nov 16, 2019, 07:30 PM IST
काँग्रेसचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना आणखी मदत देऊ- अशोक चव्हाण title=

मुंबई: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्यपालांनी जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे. मात्र, प्रशासनाने ही मदत तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. काँग्रेसचा सहभाग असलेले नवीन सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अतिरिक्त मदत जाहीर केली जाईल, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना कोरडवाहूसाठी २ हेक्टरपर्यंत ८ हजार प्रती हेक्टर तर फळबागा व बारमाही पिकांसाठी १८ हजार रूपये प्रती हेक्टर मदत देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते. 

ऊस दराचा तोडगा न काढताच साखर कारखानदारांची बैठक आटोपली

यावेळी चव्हाण म्हणाले की, पावसाने केलेले प्रचंड नुकसान पाहता शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची आवश्यकता आहे. मात्र, राज्यपालांनी आज जाहीर केलेली मदत पुरेशी नाही. तरीही राज्यात सरकार अस्तित्वात नसताना जाहीर झालेल्या या मदतीचे प्रशासनाने तातडीने वितरण करावे. सदरहू रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, अशी मागणी करून अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा सहभाग असलेले सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या या मदतीत अधिक वाढ केली जाईल, असे म्हटले आहे.

अधिकाऱ्यांची नियुक्ती होऊनही मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचं काम ठप्पच

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी हेक्टरी ८ हजार रुपयांची मदत जाहीर करून शेतकऱ्यांना काहीप्रमाणात दिलासा दिला. त्यानुसार दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी ही नुकसान भरपाई मिळेल. तर फळबागा आणि बारमाही पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी १८००० रुपये इतकी नुकसान भरपाई मिळणार असल्याचे राजभवनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.