राष्ट्रवादीने दगा दिल्यास काँग्रेस स्वबळावर

महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांची बैठक दिल्लीत पार पडली.

Updated: Jul 1, 2018, 02:24 PM IST
राष्ट्रवादीने दगा दिल्यास काँग्रेस स्वबळावर title=

नवी दिल्ली: राष्ट्रवादीने दगा दिल्यास काँग्रेस स्वबळावर लढणार, असं सांगत मल्लिकार्जून खरगे यांनी राष्ट्रवादीच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी सोबत आली नाही तर काय करायचं असा सवाल काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला. त्यावर राष्ट्रवादीने दगा दिला तर सर्व जागा लढवायच्या असं खरगे यांनी स्पष्ट केलं.

काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीत खलबतं

महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांची बैठक दिल्लीत पार पडली.. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, बाळासाहेब थोरात, एकनाथ गायकवाड, हर्षवर्धन पाटील, रजनी पाटील, संजय निरुपम, विलास मुत्तेमवार, नितीन राऊत, राजीव सातव हे काँग्रेसचे नेते उपस्थित होते.

युती आणि आघाडीचे वारे

दरम्यान, राज्यातील सध्याची राजकीय स्थिती पाहता कोणत्याही एका पक्षास बहुमत मिळेल अशी चिन्हे नाहीत. त्यामुळे प्रत्येक पक्षाला कोणत्या ना कोणत्या पक्षासोबत आघाडी करावी लागणार आहे. त्यामुळे समविचारी पक्षांनी एकत्र यावे असा सूर राजकीय वर्तुळात आहे. मात्र, शिवसेनेने स्वबळाचा नारा आगोदरच दिला आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना युती होणार का? याबात उत्सुकता आहे. दरम्यान, सेना-भाजपला पराभूत करायचे तर, काँग्रेस-राष्ट्रवादीने या पक्षांनी एकत्र यावे, असा विचार दोन्ही पक्षांमध्ये आहे. मात्र, तरीही दोघांमध्ये अविश्वासाचे वातावरण आहे. त्यामुळेच तर ऐनवेळी राष्ट्रवादीने दगा दिल्यास स्वबळावर लढायचा विचार काँग्रेसमध्ये बळावतो आहे.