मुंबई : शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडीला धोका निर्माण झाला आहे. राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने नेत अलर्ट झाले आहेत. कॉंग्रेस नेते कमलनाथ आज शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
कॉंग्रेसनेते कमलनाथ साडे बारा वाजता मुख्यमंत्र्यांना वर्षा बंगल्यावर भेटणार आहेत. दरम्यान, दीड वाजता शरद पवार यांना वाय बी इथे भेटणार आहेत. राजकीय परिस्थिती बाबत माहिती घेऊन काँग्रेस पक्षश्रेष्ठींना कळवणार आहे.
आपला वेगळा गट हीच शिवसेना असा दावा एकनाथ शिंदे यांनी केलाय. स्वतःचा वेगळा गट स्थापन करण्याची एकनाथ शिंदे यांनी तयारी केली आहे. आज दुपारीच शिंदे मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.
स्वतःचा वेगळा गट स्थापन करून त्याची माहिती शिंदे राज्यपालांना देणार असल्याचं सूत्रांची माहिती आहे. शिवसेनेनं कालच शिंदेंना गटनेतेपदावरून हटवलं आहे. आता स्वतःचा गट हाच शिवसेना असल्याचं सांगत मोठा राजकीय भूकंप घडवण्याची शिंदे यांची तयारी असल्याचं समजतंय.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या त्यांच्या आमदारांसह मंगळवारी रात्री सुरतहून गुवाहाटीत दाखल झालेत. गुवाहाटी विमानतळावर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावेळी शिवसेना सोडणार नाही असा एल्गार एकनाथ शिंदे यांनी केला आहे.