मुंबई : मार्च २०२० पासून देशभरात कोरोना लाटेची लहर सुरु झाली. या लाटेत अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला. कोरोनाच्या विळख्याने राज्यासह मुंबापुरीलाही घेरले होते. मात्र, आता तब्बल दोन वर्षानंतर मुंबईकरांना दिलासा देणारी एक 'पॉझिटिव्ह' बातमी समोर आलीय.
मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या नव्या वर्षाच्या सुरुवातीला वेगाने वाढली होती. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच कोरोना रुग्णवाढीला 'ब्रेक' लागला. फेब्रुवारीत तर, कोरोनाची तिसरी लाट जवळपास ओसरलीच. याचदरम्यान आलेल्या या 'पॉझिटिव्ह' बातमीमुळे मुंबईकरांना दिलासा मिळालाय.
जवळपास २ वर्षांनी हे आज पहिल्यांदाच घडलं आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची दैनंदिन आकडेवारी गेल्या दोन वर्षांत पहिल्यांदाच शंभराच्या खाली आली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने आज सोमवारी (२१ फेब्रुवारी २०२२) प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत मुंबईत फक्त ९६ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
या आकडेवारीनुसार बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या १८८ आहे. या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. असे असले तरी मुंबईत एकूण सक्रिय रुग्ण १४१५ आहेत.