'या दोघां'मध्ये बसलोय, बाहेर कसा येऊ?, भाजप-शिवसेना युतीच्या शक्यतेवर मुख्यमंत्र्यांचं उत्तर

30 वर्ष एकत्र होतो तेव्हा काही झालं नाही आता काय होणार?, असा प्रतिसावल मुख्यमंत्र्यांनी विचारला

Updated: Jul 6, 2021, 08:40 PM IST
'या दोघां'मध्ये बसलोय, बाहेर कसा येऊ?, भाजप-शिवसेना युतीच्या शक्यतेवर मुख्यमंत्र्यांचं उत्तर title=

मुंबई :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर शिवसेना आणि भाजपची युती होणार, नितीश कुमार यांच्या 'बिहार पॅटर्न'चा अवलंब करत उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपसोबत जाणार, असे तर्क लावले जात आहेत. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

भाजप-शिवसेना युतीबाबत प्रश्न विचारला असता मुख्यमंत्र्यांनी मिश्कीलपणे उत्तर देत आपण अजित पवार आणि बाळासाहेब थोरात या दोघांमध्ये बसलोय, बाहेर कसा येवू असा प्रतिसवाल केला. 30 वर्ष एकत्र होतो तेव्हा काही झालं नाही आता काय होणार? असा सवाल करत महाविकास आघाडी भक्कम असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सूचित केलं.

ईडी आणि सीबीआय लोकशाहीला पांढरा रंग देतंय का? असा सवाल करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्रावर जोरदार हल्लाबोल केलाय. आघाडीतल्या नेत्यांवर सुरू असलेल्या कारवाया म्हणजे केंद्राचं दबावतंत्र असल्याचा आरोप मुख्यमंत्री ठाकरेंनी केलाय. केंद्राकडून यंत्रणांचा गैरवापर होतोय असं सांगून शिवसेना-भाजप एकत्र येण्याच्या चर्चांना त्यांनी एकप्रकारे पूर्णविराम दिलाय. 

सध्या करोना स्थिती असल्याने विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेण्यात अडसर असल्याचे मी राज्यपालांना कळवले आहे. परिस्थिती नियंत्रणात आल्यावर निश्चितपणे प्राधान्याने ही निवडणूक घेतली जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.