मुंबई: मराठी आरक्षण, फोन टॅपिंग प्रकरण ते अगदी अनिल देशमुखांपर्यंत अनेक मुद्द्यावर 2 दिवसांच्या अधिवेशनात गदारोळ झाला. मात्र सर्वात जास्त अधिवेशन गाजलं ते भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनानं. पावसाळी अधिवेशनात राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं.
एकीकडे विधान भवनात सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध विरोधी भाजप असा सामना रंगला होता. तर दुसरीकडे मुंबईतल्या राजभवनात चक्क दोन मोरांची वादावादी झाली. राजकीय वातावरण तापलेलं असतानाच त्याच वेळी झालेल्या मोरांच्या भांडणाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
राज भवनाच्या हिरवळीवर एरव्ही बागडत असणारे हे मोर चक्क एकमेकांशी झुंजताना दिसले. एकमेकांच्या अंगावर धावून जात एकमेकांवर हल्लाबोल करत होते. एखादा राजकीय वाद झाला की, संबंधित राजकारणी मंडळी कैफियत घेऊन राजभवनावर येतात. पण आता राज भवनावरच्या मोरांनीच इथल्या हिरवळीचा आखाडा करून टाकला.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच युझर्सनेही त्यावर मनभरून कमेंट्स केल्या आहेत. सध्याच्या राजकीय परिस्थितीला शोभेलं असं चित्र आहे असं एका युझरने म्हटलं आहे. तर दुसरा युझर म्हणतो हे दोघं अधिवेशनातून आले असावेत. तिसरा युझर म्हणाला की सगळे भांडण सोडवायला राजभवनात येतात इथे तर हेच दोघं भांडताना दिसत आहेत. मोर आता त्यांचं गाऱ्हाणं घेऊन येणार राज्यभवनात असंही एका युझरने उपरोधानं म्हटलं आहे.