Eknath Shinde : कर नाही तर डर कशाला? असा थेट सवाल करत सध्या ED कडून कोणताही राजकीय आकस ठेवून कारवाई केल्या जात नाहीयेत असं स्पष्ट मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसमोर मांडलं. ठाकरे गटाचे नेते रविंद्र वायकर यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईनंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी कोविड काळात झालेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा प्रकाशात आणत सूचक वक्तव्य करत काही गौप्यस्फोटही केले.
'कोविड काळात काय भ्रष्टाचार केला तो सर्वांना माहितीये. किती पैसे खाल्ले, मृतदेहांच्या बॉडी बॅगमध्ये पैसे खाल्ले, 300 ग्रॅमची खिचडी 100 ग्रॅम केली', असं म्हणताना ऑक्सिजन प्लांटमध्येही पैसे खाल्ल्याची सर्व माहिती रेकॉर्डवर आहे अरा घणाघात मुख्यमंत्र्यांनी केला. यावेळी, त्यांना आम्ही कफनचोर म्हणायचं की खिचडीचोर? असा थेट सवाल केला.
रवींद्र वायकर यांच्यावरील ईडी कारवाईवर प्रतिक्रिया देत असताना ईडी महाराष्ट्र सरकारच्या हातात थोडी आहे, चूक नसेल तर घाबरण्याचं काय कारण? कर नाही त्याला डर कशाला? अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधत ईडीच्या कारवाईचं समर्थन केलं.
आम्ही राजकीय आकस ठेऊन काम करणार नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी आम्ही राज्याला पुढे नेण्याचे काम करत असल्याच्या वक्यव्यावर जोर दिला. यावेळी विरोधकांकडून ज्या प्रकल्पांसाठी विरोध केला होता त्याच प्रकल्पांना आम्ही पुढे नेण्याचं काम करतोय त्यामुळंच त्यांच्या पायाखालची वाळू सरकलीये. पण, आम्ही मात्र त्यांना आपल्या कामातूनच उत्तर देतोय असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.