मुंबई : 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वादग्रस्त नाणार प्रकल्पावरही भाष्य करत नाणार वासियांना दिलासा दिलाय.
'नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत लोकांशी चर्चा करू आणि मगच सामंजस्य करार करू', असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय... या 'मॅग्नेटिक महाराष्ट्र'मध्ये नाणारसंदर्भातला सामंजस्य करार झालेला नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.
मॅग्नेटिक महाराष्ट्रमध्ये गेल्या तीन दिवसांत एकूण ४१०६ सामंजस्य करार झालेत. या करारांच्या निमित्तानं महाराष्ट्रात एकूण १२ लाख १० हजार ४६४ कोटींची गुंतवणूक होणार आहे. यामधून एकूण ३६ लाख ७७,१८५ रोजगार निर्माण होणं अपेक्षित आहे, मुख्यमंत्र्यांनीच ही माहिती दिलीय.
दोन वर्षांपूर्वी मेक इन इंडिया मध्ये एकूण २९८४ सामंजस्य करार झाले होते... ज्याची किंमत ८ लाख कोटींहून अधिक होती.
यापैंकी ९६ करारांच्या कामांना प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. याबाबतची गुंतवणूक ही ७२ हजार कोटींची आहे. 'मेक इन इंडिया'मध्ये आत्तापर्यंत ६३.३६ टक्के सामंजस्य करार यशस्वी झाले आहेत.