Ganeshotsav 2022 : आता सर्वांना वेध लागले आहेत ते गणपतीच्या बाप्पाच्या आगमनाचे. घरगुती गणपतींबरोबरच मोठमोठ्या मंडळांचे गणपती बाप्पाचं वाजत गाजत आगमन होत आहेत. कोरोनामुळे तब्बल दोन वर्षांनंतर मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह पाहिला मिळतोय. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महागनगर पालिकेने (BMC) मुंबईतील गणेश भक्त आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सूचना आणि आवाहन केलं आहे.
महापालिकेचं आवाहन
रेल्वे मार्गावरील 13 पूल धोकादायक झालेत. त्यामुळे गणेश आगमन आणि विसर्जनासाठी पुलावरुन जाताना लाऊडस्पीकर आणि नाच-गाणी टाळाव्यात अशा सूचना आणि आवाहन करण्यात आलं आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडून सूचना करण्यात आल्यायत. मध्य रेल्वे लाईनवरुन (Central Railway) जाणारे 4 तर पश्चिम रेल्वे (Werstern Railway) लाईन वरुन जाणारे 9 पूल अतिशन जुने झाल्यानं धोकादायक झालेत. त्यामुळे खबरदारी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्यायत.
मध्य रेल्वे मार्गावरील हे पूल धोकादायक
मध्य रेल्वे मार्गावरील चार पूल धोकादायक असून यात घाटकोपर रेल्वे ओव्हर ब्रिज, करीरोड रेल्वे ओव्हर ब्रिज, साने गुरुजी (Arther Road) रेल्वे ओव्हर ब्रिज, भायखळा रेल्वे ओव्हर ब्रिज या पुलांचा समावेश आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावरच हे पूल धोकादायक
पश्चिम रेल्वे मार्गावरील 9 पूल धोकादायक अवस्थेत असून यात मरिन लाईन्स रेल्वे ओव्हर ब्रिज, गँटरोड आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकादरम्यान असलेला फॉकलँड रेल्वे ओव्हर ब्रिज, मुंबई सेंट्रल जवळचा बेलासिस पूर, महालक्ष्मी स्टील रेल्वे ओव्हर ब्रिज, प्रभादेवी कॅरोल रेल्वे ओव्हर ब्रिज, दादर टिळक रेल्वे ओव्हर ब्रिज, ग्रँटरोड व चर्नीरोडच्या दरम्यान असणारा सँडहर्स्ट रोड रेल्वे ओव्हर ब्रिज, फ्रेंच रेल्वे ओव्हर ब्रिज आणि केनडी रेल्वे ओव्हर ब्रिज या पुलांचा समावेश आहे.
करीरोड रेल ओव्हर ब्रिज, साने गुरुजी मार्ग (आर्थर रोड) रेल ओव्हर ब्रिज किंवा चिंचपोकळी रेल ओव्हर ब्रिज आणि भायखळा रेल ओव्हर ब्रिज या पुलांवर एकावेळेस 16 टनांपेक्षा अधिक वजन होणार नाही, याची काळजी घेण्याचेही आवाहन करण्यात आलं आहे.