गणेशोत्सव मिरवणुकींसाठी 13 पूल बंद, धोकादायक पुलांच्या यादीत तुमच्याही परिसराचं नाव?

Ganesh Utsav : गणेशोत्सवाची धूम सगळीकडे पाहायला मिळत आहे. पण या दरम्यान BMC ने धोकादायक पुलांची यादी जाहीर केली आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Aug 31, 2024, 12:10 PM IST
गणेशोत्सव मिरवणुकींसाठी 13 पूल बंद, धोकादायक पुलांच्या यादीत तुमच्याही परिसराचं नाव? title=

मनोज कुळकर्णी, झी मीडिया, मुंबई : गणेशोत्सव लवकरच सुरू होत असून गणेशाचे आगमन व्हायला सुरुवात झाली आहे. वाजत गाजत मिरवणुक रस्त्यांवर पाहायला मिळते आहे. आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत करण्यासाठी अगदी वेगवेगळी मंडळी आणि कुटुंब सज्ज झाले आहे. असं असताना बाप्पाची छान मिरवणुक काढली जाते. अशावेळी मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील 13 धोकादायक पुलांची यादी जाहीर केली आहे. 

मुंबई शहर आणि उपनगरातील जुन्या व धोकादायक 13 पुलांवरून मिरवणूक नेताना काळजी घेण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील 13 पूल धोकादायक स्वरुपाचे असून, काही पुलांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. शिवाय, काही पुलांची कामे पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार असल्यामुळे गणेशभक्तांनी श्रीगणेशाचे आगमन-विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान या पुलांवरून जाताना काळजी घ्यावी. याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई पोलीस यांच्या वतीने वेळोवेळी करण्यात येणाऱ्या सूचना व निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे

मध्य रेल्वेवरील धोकादायक पूल

मध्य रेल्वेवरील घाटकोपर रेल्वे ओव्हर ब्रिज, करी रोड रेल्वे ओव्हर ब्रिज, आर्थर रोड रेल्वे ओव्हर ब्रिज किंवा चिंचपोकळी रेल्वे ओव्हर ब्रिज, भायखळा रेल्वे ओव्हर ब्रिज, शीव (सायन) स्टेशन रेल्वे ओव्हर ब्रिजवरून मिरवणूक नेताना काळजी घ्यावी. 

पश्चिम रेल्वेवरील धोकादायक पूल 

 पश्चिम रेल्वे मार्गावरील मरीन लाईन्स रेल्वे ओव्हर ब्रिज, सँडहर्स्ट रोड रेल्वे ओव्हर ब्रिज (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये), फ्रेंच रेल्वे ओव्हर ब्रिज (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये), केनडी रेल्वे ओव्हर ब्रिज (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये), फॉकलॅन्ड रेल्वे ओव्हर ब्रिज (ग्रॅन्ट रोड व मुंबई सेंट्रलच्या मध्ये), महालक्ष्मी स्टेशन रेल्वे ओव्हर ब्रिज, प्रभादेवी–कॅरोल रेल्वे ओव्हर ब्रिज आणि दादर येथील लोकमान्य टिळक रेल्वे ओव्हर ब्रिज आदींवरून मिरवणूक नेताना काळजी घ्यावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 

या 13 पुलांवर एकावेळेस अधिक वजन होणार नाही, याची काळजी घ्यावी. या पुलांवर ध्वनीक्षेपकाचा वापर करुन नाचगाणी करण्यात येऊ नये. उत्सवाचा आनंद पुलावरुन खाली आल्यावर घ्यावा. पुलावर एका वेळेस भाविकांची जास्त गर्दी न करता, पुलावर जास्त वेळ न थांबता त्वरित पुलावरुन पुढे जावे, पोलीस व बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या सुचनेनुसार मार्गक्रमण करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.