Maharashtra Politics : राज्यात गेले आठ दिवस सुरु असलेल्या सत्तानाट्याचा आज अखेर शेवट झाला आहे. राज्यात सत्ताबदल होणार हे आता स्पष्ट झालं आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर राज्यात गेली अडीच वर्ष चाललेलं महाविकास आघाडी सरकारही कोसळलं आहे.
शिंदे गटाने 39 आमदारांसह बंड पुकारल्याने ठाकरे सरकार अल्पमतात आलं होतं. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सरकारने बहुमत सिद्ध करावं असं सांगितल्यानंतर त्याविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयाचा निर्णय ठाकरे सरकारच्या बाजूने न लागल्याने अखेर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आहे.
दुसरीकडे मविआ सरकार कोसळल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा केला. फडणवीस यांचा शपथविधी एक दोन दिवसांत होईल, तो अडीच वर्षांपूर्वी व्हायला हवा होता, अशी प्रतिक्रिया गणेश नाईक यांनी दिली आहे. तर महाराष्ट्रात विकासपर्व सुरु होणार असल्याची प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली.
दरम्यान, भाजप सरकार स्थापनेचा दावा करणार असून येत्या एक तारखेला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे शपथ घेण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात फोनवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप नेते उद्याच राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे.