देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई: सध्याच्या राज्य सरकारमध्ये एक नव्हे तर तीन ते चार मुख्यमंत्री आहेत. तसेच उद्धव ठाकरे हे तर मातोश्रीच्या पिंजऱ्यात बंद आहेत, अशी जळजळीत टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली. ते सोमवारी मुंबईतील भाजप मुख्यालयात झालेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या कारभारावर ताशेरे ओढले. गेल्या अनेक महिन्यांत मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीतून बाहेर पाऊल टाकलेले नाही. ते बाहेर पडले तरी फार काही बोलत नाहीत. अनेक महिने मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयाचे तोंडही पाहिलेले नाही. त्यामुळे सरकारी अधिकारी आदेश पाळत नाही. जगाच्या पाठीवर कुठेही असा मुख्यमंत्री सापडणार नाही आणि कोणी ठेवणारही नाही, असे नारायण राणे यांनी म्हटले.
'पंढरपुरला जाऊन विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीला स्पर्शही केला नाही; मुख्यमंत्री हिंदू आहेत ना?'
राज्यातील उद्योगधंदे कोलमडून पडले तरी मुख्यमंत्री डोळे मिटून आहेत. लोकांना पगार मिळत नाहीत. तरी मुख्यमंत्री फक्त लॉकडाऊन करतायत. ते निष्क्रिय असल्यामुळे प्रशासन चालवू शकत नाहीत. त्यामुळेच मी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच मागणी केली होती. या मागणीवर मी आजही ठाम असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून अधिकाऱ्यांच्या बदल्या; मातोश्रीवर पोलीस आयुक्तांची कानउघडणी
आज मुंबईसारखं जागतिक दर्जाचं शहर भकास होत चाललं आहे. याला जबाबदार शिवसेना आहे. मुंबई महानगरपालिकेत जितका भ्रष्टाचार आहे, तसा अन्य कुठल्याही संस्थेत नाही. दिवाळखोरीत गेलेली बेस्ट खासगीकरणाच्या दिशेने जात असल्याचीही टीका राणे यांनी केली. त्यामुळे आता राणेंच्या या टीकेला शिवसेनेकडून कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.