महाराष्ट्रातही बर्ड फ्लू दाखल, मुख्यमंत्र्यांनी बोलवली महत्त्वाची बैठक

राज्यातील बर्ड फ्ल्यूच्या संसर्गाबाबत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची बैठक बोलवली आहे.

Updated: Jan 11, 2021, 12:30 PM IST
महाराष्ट्रातही बर्ड फ्लू दाखल, मुख्यमंत्र्यांनी बोलवली महत्त्वाची बैठक title=

मुंबई : राज्यातील बर्ड फ्ल्यूच्या संसर्गाबाबत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची बैठक बोलवली आहे. बीड, लातूर, परभणी, चेंबुरमध्ये पक्षांचा मृत्यु झाल्याच्या घटना घडत आहेत. पक्षांचे मृत्यु कशामुळे झाले याबाबतचा काही ठिकाणचे वैद्यकीय अहवाल आलेले नाहीत मात्र परभणीत बर्ड फ्लूमुळेच कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचा अहवाल भोपाळच्या राष्ट्रीय प्रयोग शाळेने दिला आहे. 

७ राज्यात बर्ड फ्लुने थैमान घातलं असताना आता राज्यातही या बाबतची गंभीरता लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी बर्ड फ्ल्यूच्या संसर्गाबाबत बैठक बोलावली आहे. राज्यात घडत असलेल्या पक्षांच्या मृत्यूच्या घटनांबाबत आढावा घेतला जाईल आणि त्यावर चर्चा होऊन पुढील दिशा ठरवण्यात येईल. आज संध्याकाळी ५ वाजता ही बैठक होणार आहे.

२००६ पेक्षा आत्ताचा बर्ड फ्लू वेगळा आहे त्यामुळे कोणत्याही पोल्ट्रीचालकांनी माहिती लपवू नये असं आवाहन पशू संवर्धनमंत्री सुनील केदार यांनी केलं आहे. एकटया परभणी जिल्ह्यात ८० हजार कोंबड्या माराव्या लागणार आहेत असं त्यांनी म्हटलं आहे. ७० ते ८० डिग्री सेल्सिअसवर चिकन अर्धातास शिजवून खाण्यास हरकत नाही असं सुनील केदार यांनी स्पष्ट केलं आहे. पुणे आणि नागपुरात भोपाळच्या लॅबच्या तोडीची लॅब तयार कऱण्यात आलीय. तिथे सँपल टेस्टींगची परवानगी लवकरच मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

संबंधित बातमी : बर्ड फ्लू : अंडे-चिकन खरेदी करताना घ्या अशी काळजी