मुंबई : मुंबईतल्या चेंबूर टाटा नगर वसाहतीत 9 कावळ्यांचा संशयास्पद मृत्यू झालाय. ठाणे पाठोपाठ मुंबईत ही पक्ष्याचा मृत्यू त्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. यासंदर्भात मुंबई पोलिसांनी महानगरपालिकेला कळवलंय. कावळ्यांचे शव विच्छेदन झाल्यावर मृत्यूचं कारण समोर येईल.
तर नवी मुंबईतल्या खारघरमध्ये स्टेशन तसंच भारती विद्यापीठ परिसरात काही कावळे आणि साळुंख्या मृत अवस्थेत सापडल्यायत. गेल्या दोन दिवसांपासून काही कावळे आणि साळुंखी मरून पडत असल्याचं स्थनिक नागरिकांनी सांगितलंय. यामुळे येथील नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
अमरावतीच्या बडनेरामधल्या दत्तवाडी परिसरात 40 कोंबड्या दगावल्यायत. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिक चिंतेत सापडलेत. दगावलेल्या या कोंबडयांचे स्वॅब घेण्यात आले असून ते अमरावतीच्या जिल्हा पशुवैद्यकीय रुग्णालयात तपासणीसाठी पाठवलेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच कोंबड्याचा मृत्यू नेमका कशानं झाला हे स्पष्ट होणारेय.
तर दुसरीकडे मेळघाट आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या दिया गावाजवळ देखील शेकडो कावळे मृतावस्थेत आढळून आल्यानं खळबळ उडालीय. नेमक्या कुठल्या आजारानं कावळे दगावले याचं कारण शोधण्याचं आवाहन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसमोर आहे.
दरम्यान बर्ड फ्लूचा वाढता धोका पाहता चिकन आणि अंड्याच्या मागणीत घट झालीय. अमरावतीमध्ये आठ दिवसांपूर्वी 200 रुपये प्रतिकिलो विकलं जाणारं चिकन आता मात्र 150-170 रुपये किलोनं विकलं जातंय. अंड्यांच्या किमतीतही मोठी घसरण झालीय.