शिवसेनेकडून बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'हे' २० स्टार कॅम्पेनर्स सज्ज

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून २० जण स्टार कॅम्पेनर 

Updated: Oct 8, 2020, 09:32 AM IST
शिवसेनेकडून बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'हे' २० स्टार कॅम्पेनर्स सज्ज title=

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना देखील सज्ज झाली आहे. बिहारच्या निवडणुकीत शिवसेना उतरणार असल्याचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी नुकतेच जाहीर केले होते. त्यानंतर आता शिवसेनेने आपल्या स्टार कॅम्पनेर्सची यादी देखील जाहीर केली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून २० जण स्टार कॅम्पेनर सज्ज झाले आहेत. २०१५ मध्ये शिवसेनेनं ८० जागा लढवत २ लाखांपेक्षा जास्त मतं घेतली होती. 

या स्टार कॅम्पेनर यादीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह २० जणांचा समावेश आहे. सुभाष देसाई, चंद्रकांत खैरे, अनिल देसाई, विनायक राऊत, अरविंद सावंत, गुलाबराव पाटील, राजकुमार बाफना, प्रियांका चतुर्वेदी, राहूल शेवाळे, कृपाल तुमाने, सुनील चिटणीस, योगराज शर्मा, विनय शुक्ला, गुलाबचंद दुबे, अखिलेश तिवारी आणि अशोक तिवारी हे स्टार कॅम्पेनर असणार आहेत. 

शिवसेनेनं निवडणूक आयोगाकडं ही यादी सोपावली आहे. शिवसेना बिहारमध्ये ५० जागा लढवण्याच्या तयारीत आहे. बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांच्याविरोधात शिवसेना प्रचारात उतरणार असल्याचे सांगण्यात येत होते. पण आता जेडीयूने गुप्तेश्वर पांडेंचे तिकिट कापल्याचे वृत्त आहे. आता शिवसेनेची रणनिती काय असणार ? हे पाहणे महत्वाचे असणार आहे. 

जेडीयूची यादी जाहीर 

जेडीयूने सर्व १२१ उमेदवारांची यादी जाहीर केली असून यात गुप्तेश्वर पांडे यांचे नाव नाही. विशेष म्हणजे ज्या बक्सरमधून ते निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक होते. त्या जागेवर भाजपने परशुराम चतुर्वेदी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यादी जाहीर झाल्यानंतर गुप्तेश्वर पांडे यांनी आपण यंदा निवडणूक लढवणार नसल्याचे फेसबूकवर जाहीर केले आहे. 

सारवासारव करण्याचा प्रयत्न 

तिकीट कापले गेल्यामुळेच त्यांनी आता सारवासारव करण्याची भूमिका घेतल्याचे दिसत आहे. निवडणूक लढवण्यासाठी अतिउत्साहात पोलीस महासंचालकपदाचा राजीनामा देणाऱ्या गुप्तेश्वर पांडे यांना महाराष्ट्र द्वेश भोवल्याचे बोलले जात आहे.