अमित जोशी / मुंबई : मास्कचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि दर नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य सरकारने पावले उचचली आहेत. त्यामुळे मास्कचे दर चार पटीने कमी होतील, अशी अपेक्षा आहे. मास्कचे दर नियंत्रित करण्याबाबतच्या समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. मास्कचे दर अव्वाच्या सव्वा वाढवून नफा कमावला जात असल्याची कबुली आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
मास्कसाठी १५ टक्के नफा देण्याचं ठरवलं असून आता एन ९५ मास्क १९ ते ५० रुपयांपर्यंत आता मिळू शकणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. कोरोना उद्रेकाच्या सुरुवातीच्या काळात मास्क विक्रीतून खासगी कंपन्यांनी अव्वाच्या सव्वा नफा कमावल्याचं उघडकीस आलंय. एन-९५ मास्क, थ्री लेअर मास्क आणि सर्जिकल मास्कच्या किंमती मागणी वाढली तशा अव्वाच्या सव्वा वाढवल्या.
काही कंपन्यांनी तर १९ रुपयांचा मास्क १३५ रुपयांना विकला. या प्रकरणी सरकारनं मास्कच्या दरनिश्चितीसाठी नेमलेल्या समितीच्या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आलीय. आता कंपन्यांच्या नफेखोरीला आळा घालण्यासाठी मास्कचे नवे दर निश्चित करण्यात आलेत. त्यानुसार एन-९५ मास्कची किंमत १३५ वरुन १९ रुपये, ट्रिपल लेयर मास्कची किंमत १६ रुपयावरुन ४ रुपये, तर, टू लेयर मास्कचे दर १० रुपयावरुन ४ रुपयांपर्यंत खाली आणण्याची शिफारस केली आहे.
कोरोना संकटाला सात महिने उलटल्यानंतर सरकारला मास्कच्या किंमती निश्चित करण्याचं सूचलय. उशीरा का होईना सरकारनं जाहीर केलेल्या या किंमतीत मास्क मिळतील ही अपेक्षा.