भास्कर जाधव शिवबंधनात, 'पूर्वाश्रमीच्या घरात दाखल झालो'

भास्कर जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला.  

Updated: Sep 13, 2019, 03:07 PM IST
भास्कर जाधव शिवबंधनात, 'पूर्वाश्रमीच्या घरात दाखल झालो' title=

मुंबई : राष्ट्रवादीचे गुहागरचे विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी मातोश्रीवर जात शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. भास्कर जाधव यांच्यासोबत त्यांच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पर्यावरण मंत्री रामदास कदम, खासदार संजय राऊत उपस्थित होते. जाधव यांच्या शिवसेना प्रवेशामुळे कोकणात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.

भास्कर जाधव विमानाने औरंगाबादेत नंतर मुंबईत

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांना तुमचे कौतुक होते. शिवसैनिक लढवैया होता आणि आहे. तुमचे पुन्हा एखादा शिवसेनेत स्वागत करतोय, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली. त्याचवेळी पक्षप्रवेशानंतर भास्कर जाधव यांनीदेखील आपल्या भावना व्यक्त केल्या. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माझे कोणाशीही वाद नाहीत किंवा कोणावरही आरोपही नाही. मी मूळचा शिवसैनिक आहे. पूर्वी जे झाले ते झाले. माझा मूळ स्वभाव मला स्वस्थ बसू देत नव्हता. त्यामुळे मी माझ्या पूर्वाश्रमीच्या घरात दाखल झालो आहे.

यावेळी त्यांनी मी शिवसेना का सोडताना कोणावर आरोप केला नव्हता. मात्र, मी शिवसेना सोडली ती मिलिंद नार्वेकर यांच्यामुळे, असे कधीही म्हटलेले नाही. मी कधीही त्यांच्यावर आरोप केला नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

दरम्यान, भास्कर जाधव यांनी शुक्रवारी सकाळी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. चार्टड विमानाने औरंगाबाद येथे जाऊन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते अनिल परब, चंद्रकांत खैरे, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, आमदार उदय सावंत उपस्थित होते.