बेस्ट संपाचा तिढा कायम, बैठक निष्फळ

तीन दिवसांनंतरही बेस्टचा संप कायम आहे. महापौर बंगल्यावर रात्री उशिरापर्यंत चाललेली बैठक निष्फळ ठरली.  

Updated: Jan 11, 2019, 12:04 AM IST
बेस्ट संपाचा तिढा कायम, बैठक निष्फळ  title=

मुंबई : तीन दिवसांनंतरही बेस्टचा संप कायम आहे. महापौर बंगल्यावर  रात्री उशिरापर्यंत चाललेली बैठक निष्फळ ठरली. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह बेस्ट कर्मचारी संयुक्त कृती समितीचे सदस्य, मुंबई महापालिका आयुक्त, महाव्यवस्थापक, महापौरांसह पालिकेतील पदाधिकारी यांच्यात ही बैठक झाली. मात्र, या बैठकीत कोणताही तोडगा न निघता बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे उद्या चौथ्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप कायम राहणार आहे. त्यामुळे मुंबईतील २५ लाख प्रवाशांना पुन्हा या संपाची झळ बसणार आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने संपावर कोणताही तोडगा निघालेला नाही. बेस्टचा संप तिसऱ्या दिवशी सुरु आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीने कर्मचारी संघटनांच्या मागण्यांबाबत बेस्ट प्रशासन, महापालिका आयुक्त अजय मेहता आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यात रात्री उशिरापर्यंत महापौर निवासस्थानी बैठक झाली. मात्र, काहीही तोडगा निघाला नाही. त्यामुळे ही चर्चा फुकट गेली. चौथ्या दिवशी हा संप सुरुच राहणार आहे. दरम्यान, या संपाबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे उद्या याबाबत न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे या संपाबाबत न्यायालय काय निर्णय देणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

दरम्यान, शुक्रवारी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा मेळावा घेण्यात येणार आहे. त्यामध्ये बेस्ट संयुक्त कृती समितीच्या संपाची आणि बेस्ट प्रशासन, मुंबई पालिका आयुक्त यांच्याशी झालेल्या चर्चेची माहिती कर्मचाऱ्यांसमोर ठेवण्यात येणार आहे. आता कर्मचारीच संपाबाबतची पुढील दिशा ठरवतील, असे कामगार नेते शशांक राव यांनी बैठकीनंतर सांगितले. त्यामुळे उद्या चौथ्या दिवशी हा संप सुरु राहणार असल्याचे संकेत शशांक  राव यांनी यावेळी दिले आहेत.

बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्यास आयुक्तांनी स्पष्ट नकार दिला आहे. तसेच बेस्टमधील ज्युनिअर ग्रेड कर्मचाऱ्यांना मास्टर ग्रेड लागू करण्यासाठी आणि बोनसची रक्कम देण्यासाठी पैसेच नसल्याचे कारण देत आयुक्त आणि बेस्टचे महाव्यवस्थापक यांनी नकार दिला आहे. त्यामुळे आमच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत हा संप सुरु ठेवण्याचा निर्धार बेस्ट कर्मचाऱ्यांच्यावतीने शशांक राव यांनी केला.