दहावी, बारावी परीक्षांचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी.  

Updated: Jan 10, 2019, 08:49 PM IST
दहावी, बारावी परीक्षांचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता title=

मुंबई : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी. यंदा राज्य शिक्षण मंडळांच्या म्हणजेच दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे. कारण साधारण मार्च महिन्यापासूनच राज्यातल्या शिक्षकांना निवडणुकीची कामे करावी लागणार आहेत. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना निवडणुकीच्या ड्यूटीही शिक्षकांना कराव्या लागतात. त्यासाठी प्रशिक्षणही मार्च-एप्रील महिन्यात सुरु होणार आहे. मात्र, याच काळात दहावी बारावी परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम असते. मे महीना अखेर हे निकाल जाहीर होणे अपेक्षित आहे. मात्र, पेपर तपासणीच्या दरम्यान निवडणुकीची कामे करावी लागणार आहेत. यामुळे यावर्षी दहावी बारावीचा निकाल वेळेत कसा लागायचा याची चर्चा शिक्षक वर्गात सुरु आहे.

लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधी शाळांकडून शिक्षकांच्या नावांची यादी सरकारकडून मागविण्यात आली आहे. त्यामुळे शाळांमध्ये ही यादी बनविण्याचे कामही सुरु झाले आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर शिक्षकांना निवडणुकीबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी आता वेळ द्यावा लागणार आहे. यामुळे शाळांना मुलांच्या अभ्यासक्रमाबाबत कसरत करावी लागणार आहे. तसेच मे महिन्याच्या अखेरीस निकाल लागण्याची शक्यता असते. त्यानंतर दहावी, बारावी प्रवेश प्रक्रिया सुरु असते. त्यामुळे वेळेत निकाल लागले तर पुढील प्रवेश घेण्यासाठी वेळ मिळतो. मात्र, यावेळी निवडणुकीची कामे शिक्षकांवर असल्याने वेळेत पेपर कसे तपासायचे याची चिंता शिक्षकांना लागली आहे. निवडणूक काम आणि पेपर तपासणीचे काम याबाबत शिक्षकांना मोठी कसरत करावी लागणार आहे. जर पेपर तपासणीचे काम निवडणूक कामांमुळे शक्य झाले नाही. किंवा उशिरा झाले तर त्याचा परिणाम हा निकालावर दिसून येईल. परिणामी वेळेत निकाल लागण्याची शक्यता कमी आहे, अशी कुजबूज शैक्षणिक क्षेत्रात सध्या सुरु आहे.