Ayodhya Ram Temple: 22 जानेवारीला महाराष्ट्रात सुट्टी जाहीर; शेअर मार्केटही बंद राहणार?

राज्य सरकारने 22 जानेवारीला सुट्टी जाहीर केली आहे. यामुळे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी सरकारी कार्यालयं, शाळा, कॉलेज बंद असणार आहेत.   

शिवराज यादव | Updated: Jan 19, 2024, 05:48 PM IST
Ayodhya Ram Temple: 22 जानेवारीला महाराष्ट्रात सुट्टी जाहीर; शेअर मार्केटही बंद राहणार?  title=

सध्या देशभरात अयोध्या राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त उत्साहाचं वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिवाळीप्रमाणे हा दिवस साजरा कऱण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान हा सोहळा अनुभवता यावा यासाठी केंद्र सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. तसंच महाराष्ट्रासह इतर भाजपासहित राज्यांनीही सार्वजनिक सुट्टीची घोषणा केली आहे. दरम्यान या दिवशी शेअर मार्केट सुरु असणार आहे की नाही? असा प्रश्न गुंतवणूकदरांना सतावत आहे. 

केंद्र सरकारने अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली असून याचा परिणाम मार्केटवरही होणार आहे. शेअर मार्केट नियमितपणे सुरु राहणार आहे. पण मनी मार्केट फक्त अर्धा दिवसच सुरु राहील. 22 जानेवारीला मनी मार्केट दुपारी 2.30 वाजता सुरु होणार आहे. फॉरेक्स-बाँड मार्केटमध्ये 2.30 ते 5 दरम्यान व्यवहार होणार आहेत. 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने 22 जानेवारी 2024 रोजी मार्केट ट्रेडिंगच्या वेळात बदल जाहीर केला आहे. 22 जानेवारीला अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याने मध्यवर्ती बँकेने ट्रेडिंगच्या वेळेत बदल केल्याची माहिती दिली आहे. 

हा बदल भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेने नियमन केलेल्या विविध मार्केटच्या ट्रेडिंगमधील तासांशी संबंधित आहे ज्यात कॉल/नोटीस/टर्म मनी, सरकारी सिक्युरिटीजमधील मार्केट रेपो, सरकारी सिक्युरिटीजमधील ट्राय-पार्टी रेपो, कॉर्पोरेट बाँडमधील रेपो, सरकारी सिक्युरिटीज (Central Government Securities, State Government Securities and Treasury Bills) यांचा समावेश आहे.

शनिवारी शेअर मार्केट सुरु राहणार 

नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने 29 डिसेंबर 2023 ला माहिती दिली होती की, शनिवारी म्हणजेच 20 जानेवारीला शेअर बाजाराचं कामकाज सुरु राहणार आहे. या दिवशी तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करु शकता. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने रिकव्हरी साइटवर इंट्राडे (Intraday) स्विच-ओव्हरसाठी हे खास सत्र ठेवलं आहे. उद्या दोन्ही स्टॉक एक्स्चेंजमध्ये छोट्या छोट्या दोन सत्रात ट्रेडिंग करु शकता. 

नव्या वर्षात या ट्रेडिंग सेशनच्या माध्यमातून स्टॉक एक्स्चेंज डिझास्टर रिकव्हरी (DR) साइटचं ट्रायल केलं जाणार आहे. एखाद्या संकटाच्या स्थितीत कोणत्याही अडचणीविना ट्रेडिंग सुरु राहावं यासाठी हे ट्रायल घेतलं जाणार आहे. मार्केट आणि गुंतवणूकदारांना स्थिरता देणं हा मुख्य हेतू आहे. 

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी 2 विशेष सत्रांचं आयोजन केलं जाणार आहे. पहिलं लाईव्ह सेशन सकाळी 9.15 वाजता सुरु होईल. पहिलं सत्र 45 मिनिटांचं असून, 10 वाजता संपेल. याचं ट्रेडिंग प्रायमरी वेबसाइट असेल. तर दुसरं सत्र 11.30 वाजता सुरु होईल. हे सत्र 1 तासांचं असेल, जे 12.30 वाजता बंद होईल. तसंच प्री क्लोजिंग सत्र दुपारी 12.40 ते 12.50 पर्यंत असणार आहे.