किशोरी पेडणेकरांना चौकशीसाठी ईडीचं समन्स; शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक दणका

मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांना ईडीनं समन्स पाठवलंय... कोरोना काळात मुंबई महापालिकेत झालेल्या कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांनी चौकशी होणार आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jan 19, 2024, 05:15 PM IST
किशोरी पेडणेकरांना चौकशीसाठी ईडीचं समन्स; शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक दणका title=

Kishori Pednekar ED Raid : शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक दणका बसला आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना चौकशीसाठी ईडीचं समन्स बजावण्यात आले आहे. कोव्हिड बॉडीबॅग घोटाळाप्रकरणी किशोरी पेडणेकर यांची चौकशी होणार आहे. दरम्यान, एका दिवसात महाविकास आघाडीतील दोन नेत्यांवर कारवाईची टांगती तलावर आली आहे.  राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना देखील ईडीची नोटीस आली आहे.  
कोव्हिड बॉडीबॅग घोटाळाप्रकरणी  किशोरी पेडणेकरांना गुरूवारी ईडीने चौकशीसाठी बोलावलं आहे. 

काय आहे  कोव्हिड बॉडीबॅग घोटाळा प्रकरण?

बीएमसी कोविड घोटाळा प्रकरणात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर अडचणीत आल्य आहेत. मुंबईत मृत कोविड रूग्णांना वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी बॉडीबॅग 2000 रूपयांऐवजी 6800 रूपयांना विकली गेल्याचं ईडीने म्हटलंय. हे कंत्राट तत्कालीन महापौरांच्या सूचनेनुसार देण्यात आल्याचं ईडीने म्हटलंय. कोविड काळात किशोरी पेडणेकर याच महापौर होत्या.  ईडीने राज्यभर छापे मारले होतो. या छाप्यात 68 लाख 65 हजार रूपये रोकड, 150 कोटींची स्थावर मालमत्ता सील करण्यात आली होती. या शिवाय 15 कोटींची एफडी आणि इतर गुंतवणूकही ईएडीला आढळली होती. या प्रकरणात ईडीने ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण, सुजीत पाटकरसह 10 ते 15 जणांवर छापे मारले होते. दरम्यान मुंबई महानगरपालिकेत कोविड काळात एक हजार कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता.

ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची एसीबीकडून 10 तास चौकशी

आमदार राजन साळवी यांची एसीबीकडून 10 तास चौकशी करण्यात आली होती. चौकशीचा अहवाल वरिष्ठांना सादर करुन पुढील कारवाई केली जाणार आहे. दरम्यान अधिका-यांनी फोनही घेतल्याचा आरोप साळवींनी केलाय. तसंच साळवींना पुन्हा एसीबीनं नोटीस पाठवली. सोमवारी रत्नागिरी कार्यालयात दुपारी 12 वाजता हजर राहण्याचे समन्स साळवींना देण्यात आले होतो. यावेळी साळवींच्या मोठ्या भावालाही उपस्थित राहण्याचा उल्लेख नोटिशीत करण्यात आलाय. यामुळे साळवींच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना ईडीची नोटीस

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना ईडीनं नोटीस बजावलीय. बारामती ऍग्रो कंपनी तसच इतर खासगी कंपन्यांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीनं ही नोटीस बजावलीय. पुढील आठवड्यात ईडीमार्फत रोहित पवारांची चौकशी होण्याची शक्यता आहे. याआधीही रोहित पवार यांच्या कारखान्यांवर आयकर विभागानं छापे टाकले होते.