मुंबई : एन्कांऊटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी एबी फॉर्म जाहीर केला. २०१४ च्या निवडणुकीत नालासोपारा येथील बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांनी जिंकली होती. तर शिवसेना तिसऱ्या तर भाजपा दुसऱ्या स्थानी होती. ३० वर्षे एकाच कुटुंबाची सत्ता असल्यानं तिथल्या मतदारांना आता बदल हवाय असे शर्मा यावेळी म्हणाले. एबी फॉर्म घेतला असून निवडून येण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नालासोपाऱ्यात अनेक प्रश्न मार्गी लावायची असल्याचे ते म्हणाले. हितेंद्र ठाकूरांनीच मैदानात उतरावे असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले.
प्रदिप शर्मांच्या अशा राजकीय एन्ट्रीमुळे वसई विरार शहरातील महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. शर्मांच्या नालासोपाऱ्यातील राजकीय एन्ट्रीमुळे येथे बदल होईल असा ठाम विश्वास कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. त्यामुळे गेल्या २५ वर्षांपासून वसई विरार शहरावर एकहाती सत्ता असलेल्या बहुजन विकास आघाडीचा गढ महायुतीचे सरकार जिंकू शकेल का हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.